सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी वारंवार मोर्चा ,आंदोलन करून सुद्धा कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या अद्याप पर्यंत मान्य झालेले नाहीत.या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी करा याची मागणी करीत भोर येथे पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन आमदार संग्राम थोपटे यांना देण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या यापूर्वी मुंबई मंत्रालय,नागपूर मंत्रालय येथे वारंवार मोर्चे आंदोलने करण्यात आली. मात्र कुठल्याही प्रकारच्या मागण्या अद्याप पर्यंत मान्य झालेला नाही.राज्य शासनाने यावलकर समितीची नेमणूक करून राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अहवाल मागितला होता. याबाबत यावलकर समितीने ३१ मे २०१८ राज्य शासनाला अहवाल सादर केलेला आहे परंतु त्या अहवालाची अद्याप कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी शासन स्तरावर झालेली नाही. शासन स्तरावर केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात आहे.या धर्तीवर भोर- वेल्हा - मुलशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न अधिवेशनात लक्षवेधी करावा असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी अध्यक्ष अशोक गायकवाड ,उपाध्यक्ष अर्जुन रांजणे ,वसंत शिंदे, संस्थापक सरचिटणीस ज्ञानोबा घोणे ,कार्याध्यक्ष श्रीहरी दराडे ,उपकार्याध्यक्ष संतोष तुपे ,विभागीय अध्यक्ष सुभाष गुळवे ,राजेंद्र वाव्हळ,कोषाध्यक्ष हनुमंत पोळ उपस्थित होते.