जावळी ! धोमच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी : रब्बीची पिके लागली करपू, काही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मान्सूनने यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने खरिपाच्या हंगामानंतर रब्बीची पेरणी झाली.सध्या रब्बीची पिके शिवारात डोलत असून पाण्याअभावी करपू लागल्याचे चित्र दिसत आहे.
         यातच धोमच्या उजव्या कॅनॉलला मागील पाणी येऊन आज एक महिना पूर्ण होत आला आहे.सध्या शेत शिवारात रब्बीतील ज्वारी,कांदा, गहू, हरभरा आदी पिके जोमात आली असून त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. धोम पाटबंधारे विभागाने या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर धोमच्या उजव्या कॅनॉलला पाणी सोडावे अशी तीव्र मागणी कुडाळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून होत आहे.
           जावली तालुक्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.डोंगर उतारावरील भागात डिसेंबरमध्येच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.अश्या परिस्थितीत तालुक्यात महू,हातघेघर धरणे असूनही धरणाची कामे आजही प्रलंबीत आहेत. यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला अशी काहीशी अवस्था पाहायला मिळत आहे.कुडाळ पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांना धोम कालव्याच्या पाण्याचा आधार आहे.आज मागील पाणी येऊन महिना झाले तरी अजूनही कालव्याला पाणी नाही.यातच चार ते पाच दिवसांपूर्वी धोम धरणाचा डावा कालवा ओझर्डे येथे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.यामुळे आधीच मरकट यात मद्य प्याला अशी अवस्था पाटबंधारे विभागाची झाली.
           सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जमिनीतील ओल कमी होत चालली आहे.उजव्या कालव्याला पाणी सोडले गेले नाही तर शेतकऱ्यांचे पिकांसोबत आर्थिक नुकसानही होणार आहे.तसेच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. याकरिता तात्काळ कॅनॉलला पाणी सोडले गेले तर काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
To Top