सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रेल्वेलाईनच्या पश्चिमेकडील लोकवस्ती, शेतीकडे व मुस्लिम बांधवांच्या मशीदीकडे जाणारा
सुमारे १२५ वर्षापासून , परंपरागत, पिढ्यानपिढ्यां पासूनचा रस्ताच रेल्वेप्रशासनाने गायब केला आहे. येत्या आठ दिवसांत रेल्वेच्या हद्दीतील रस्ता रेल्वे प्रशासनाने खुला न केल्यास नीरा येथील रहिवाशी , शेतकरी , मुस्लिम बांधव ५ जानेवारी रोजी नीरा येथील रेल्वे स्टेशनसमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.
पुणे विभागाचे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, पुण्याचे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , जेजुरीचे पोलिस निरीक्षक यांना स्टेशन मस्जिदचे चेअरमन हाजी सद्रुद्दीन शेख, सेक्रेटरी असिफ तांबोळी, सिकंदर शेख, नदीम सय्यद, जावेद शेख यांनी समक्ष दिले आहे. तसेच केंद्रीय रेल्वेमंञी , रेल्वे राज्यमंञी, मुख्यमंञी, उपमुख्यमंत्री , पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक, पोलिस अधिक्षक ,लोहमार्ग ,पुरंदर तालुक्यातील महसुल व पोलिस प्रशासनालाही यांच्या सह खा.सुप्रिया सुळे, आ.संजय जगताप यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रहिवाशांनी व मुस्लिम बांधवांनी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नीरा येथील रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील लोकवस्तीतील स्थानिक रहिवाशी व ग्रामस्थ असून आमच्या लोकवस्तीकडे ,मशिदीकडे नमाज अदा करणे साठी मुस्लिम बांधव तसेच शेतीकडे जाणारे शेतकरी पिढ्यानं पिढ्या पासून सुमारे १२५ वर्षा पुर्वीचा नकाशातील नावेच्या डोव्हाकडे जाणा-या रस्त्यावरून रेल्वे रूळ ओलांडून ये- जा करीत आहोत.
रेल्वे प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणासाठी सपाटीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या पश्चिमेकडील रहिवाशांना कसेलेही लेखी न कळविता संबंधित रहिवाशांच्याकडे मालकी हक्काचे सात बारे,सिटी सर्व्हे उतारे असताना त्यांच्या जागेत रेल्वे प्रशासन हद्द कायम करीत आहे. त्यामुळे रहिवाशांवर अन्याय होत आहे. तसेच तेथील रहिवाशी पिढ्यानपिढ्या नीरा गावातून पुणे -पंढरपूर पालखी मार्गावरून गावच्या नकाशातील रस्त्यावरून ये-जा करीत असलेल्या रस्त्यावर रेल्वेच्या ठेकेदाराने मुरूम व मातीचे ढिगारे टाकून अडथळा निर्माण केलेला आहे. त्यामुळे तेथील लोकवस्तीवरील वृद्ध, अपंग रहिवाशांना हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता जाण्यासाठी, लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच लोकवस्ती लगत असलेल्या शेतक-यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी, मुस्लिम बांधवांना मशिदीत जाण्यास अडचण व अडथळा निर्माण झालेला आहे. रेल्वे प्रशासनाने नविन रेल्वे लाईनचे व प्लँटफार्मचे काम केल्या नंतर रहिवाशांना दैनंदिन भौतिक व मुलभूत सुविधे पासून वंचित रहावे लागणार आहे. तसेच त्यांचा नीरा गावापासून संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांवर अन्याय होऊन त्यांच्या सार्वजनिक जीवनावर गदा येऊन त्याचे मोठे नुकसान होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने नीरा ( ता.पुरंदर) वार्ड नं.१ मधील रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील लोकवस्तीवर जाण्या -येण्याचा नकाशातील रस्ता काढून द्यावा व तेथील रहिवाशांच्या मालकी हक्कांच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण करू नये. रेल्वे प्रशासनाने
ग्रामस्थांच्या मागण्यांची गांभिर्याने दखल घेऊन
आठ दिवसांत तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा. न्याय न मिळाल्यास रहिवाशी , ग्रामस्थ शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दोन वाजता नीरा रेल्वे स्टेशनसमोर आत्मदहन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा नीरा ( ता.पुरंदर ) येथील रहिवाशी, शेतकरी व मुस्लिम बांधवांनी दिला आहे.