सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांनी आपल्या उपाध्यक्षापदाचा राजीनामा दिला असून उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबर २०२१ ला पार पडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला होळ गटातून आनंदकुमार होळकर यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या वर्षी कोऱ्हाळे गटातून कोऱ्हाळे खुर्दच्या माजी सरपंच प्रणिता खोमणे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. मात्र आता उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांनी आपआपल्या पद्धतीने वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे समजत आहे.
आतापर्यंत सोमेश्वर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच सर्व समाजातील संचालकांना संधी दिली आहे. यावेळी देखील पवार योग्य उमेदवाराला संधी देतील अशी सभासदांच्यात चर्चा आहे. अजित पवार हेच याबाबत अंतिम निर्णय घेणार असून, ते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या संचालक मंडळातील बारामती तालुक्यातून सहकारी दूध संस्थेचा अनुभव असलेले संग्राम सोरटे, प्रशासनात काम केलेले शिवाजीराव राजेनिंबाळकर तर तरुण युवकांची मोट बांधणारे ऋषिकेश गायकवाड व किसन तांबे या नावांचा विचार होण्याची शक्यता आहे.
---------------------
पुरंदर तालुक्यातून २०१५ साली उत्तम धुमाळ यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती त्यानंतर मागील आठ वर्षात इतर कोणाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे अजितदादा यावेळी पुरंदर तालुक्याचा विचार करणार का? अशी ही सभासदांच्यात चर्चा आहे. यामध्ये सर्वात जेष्ठ संचालक विश्वास जगताप, जितेंद्र निगडे, शांताराम कापरे, बाळासाहेब कामथे, अनंत तांबे या नावांचा देखील विचार होण्याची शक्यता आहे. यांची नावे चर्चेत आहेत.