सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
यावर्षी कमी पाऊस झाल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश केला आहे. शासनाकडून तीन महिने आधी यासंदर्भात आदेश निघून सुद्धा दुष्काळी परिस्थितीत आत्ता पर्यंत कसलीच उपाय योजना करण्यात आली नसून सरकारने पूर्ण पणें दुर्लक्ष केले आहे. याबाबत वाल्हे गावात आम आदमी पार्टी पुरंदरच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे जिकरीचे झाले आहे.सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत चारा डेपो त्वरित सुरू करावेत, पीक कर्जावरील व्याज माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे , शेती पंपाचे पूर्ण लाईट बिल माफ करावे व दुष्काळ संदर्भात जीआर निघाल्या नंतर २१ दिवसा पर्यंत तो लागू व्हावा असा कायदा सरकारने करावा. या मागण्यासाठी आम आदमी पार्टी पुरंदरने वाल्हे गावात बेमुदत साखळी उपोषण शेतकऱ्यानं सोबत सुरू केले आहे.
यावेळी तालुक्यातील विविध गावातील शेतकरी नागरिकांनी आपला पाठिंबा देण्यासाठी उपोषण ठिकाणी भेट दिली.दुष्काळी उपययोजना जो पर्यंत प्रभावीपणे सरकार सुरू करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील असे आपचे राजन पवार यांनी सांगितले.