सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माण : प्रतिनिधी
धनगर समाजाला घटनेने एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण दिले असताना राज्य शासनाकडून धनगड आणि धनगर या शब्दभेद करत आजवर या समाजाला त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवत गेल्या कित्येक वर्षांपासून एस. टींच्या सोयीसवलतींपासून दूर ठेवले आहे.
समाजात असलेल्या अशिक्षित व मागासलेपणाचा गैरफायदा आजवरच्या राज्यकर्त्यांनी घेत या समाजाची फरफट चालू ठेवलेली आहे.आता मात्र हा समाज जागृत होत आहे.आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी मोर्चे आंदोलने करत आहे. गेल्या ७० वर्षात हा समाज ज्या एस.टी.प्रवर्गाच्या सोयीं- सवलतींपासून वंचित आहे त्यासाठी दि.२७ जानेवारी २०२४ पासून घटनेने धनगर समाजाला दिलेल्या एस.टी.आरक्षण दुरुस्तीची शिफारस केंद्राला करून अंमलबजावणीसाठी धनगर समाजातील तीन बांधव उत्तम विरकर, गणेश केसकर व जयप्रकाश हुलवान हे सातारा जिल्ह्यातील म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. आजवर वेळोवेळी आंदोलने करताना धनगर समाजाला शासनाकडून तात्पुरती आश्वासने देत आरक्षण अंमलबजावणीबाबत चालढकल केली गेलीय मात्र आता ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घ्यायचीच नाही असा ठाम निश्चय करून हे धनगर समाज बांधव उपोषणास बसले आहेत मात्र उपोषणास बसून ४ दिवस झाले तरी या उपोषण आंदोलनाची शासनाकडून प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने गुरुवार दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकल धनगर समाजाच्यावतीने माण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.तसे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने म्हसवड नगरषरिदचे मुख्याधिकरी डीवायएसपी मान खटाव यांना देण्यात आले आहे.