सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र शाळा महाविद्यालयात गॅदरिंग होतात ही तशी नियमित बाब... पण ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरित मुलांचे गॅदरिंग ही राज्यात दुर्मिळ बाब. असे गॅदरिंग सोमेश्वर कारखान्यावर पार पडले.
सोमेश्वरच्या कोपीवरची शाळा प्रकलपातील 200 मुलानी नृत्य, नाटक, शाहिरी कला सादर करत सर्वांची मने जिंकली. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर यांच्यावतीने ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या कोपीवरची शाळा उपक्रमांतर्गत मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धनदादा शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वासुदेवाच्या गाण्यातून शिक्षण, विज्ञान, आर्थिक साक्षरता यांचे महत्त्व पटवून दिले. फनी डान्सने प्रेक्षक खळखळून हसले. सहा महिने ऊस तोडी या गाण्याने मजुरांना आपली जगण्याची व्यथा दिसली. पाव्हन जेवला का, रस्सा रस्सा वाढ, बैलगाडा शर्यत, ढोल बाजे, खानदेशी गाणी या गाण्यावर रोज ऊसाच्या फडात नाचणारे पाय स्टेजवर थिरकत होते. दोनशेहून अधिक मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. दिवसभरातील कामाचा कंटाळा विसरून हजारहून पालक आपल्या मुलांच कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू असतानाच बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या व्यस्त वेळेतून आकस्मित भेट दिली. सुनेत्रा पवार यांचे स्टेजवर आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांचे डान्स बघून त्यांनी मुलांच कौतुक केले , कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व कोपीवरच्या शाळेच्या कामाचं कौतुक ही केलं.
कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सुनील भगत, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी सतीश काकडे, वाघळवाडी गावचे सरपंच हेमंत गायकवाड, दत्ता माळशिकारे, महेश जगताप, युवराज खोमणे, ऍड. नवनाथ भोसले, गीतांजली बालगुडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपीवरची शाळा उपक्रमाचे समन्वयक संतोष शेंडकर यांनी केले.संभाजी खोमणे, संतोष होनमाने, नवनाथ मेमाणे, आरती गवळी, अश्विनी लोखंडे, शुभम गावडे, अनिता ओव्हाळ, विकास देवडे, अक्षय इथापे, अस्मिता कांबळे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन बाबुलाल पडवळ यांनी व आभार नौशाद बागवान यांनी केले.
COMMENTS