सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
स्वच्छ, हरित, सुंदर असलेल्या बारामती शहरातील अनेक मुख्य चौकात असलेल्या अतिक्रमणांवर वाहतूक शाखेने कारवाई करत संबंधित अतिक्रमणे हटवून मुख्य चौकांचा श्वास मोकळा केला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
बारामती शहरातील गर्दीने गजबजलेल्या भिगवण चौक ते इंदापूर चौक, इंदापूर चौक ते गुणवडी चौक, गुणवडी चौक ते शिवाजी चौक या परिसरात व्यवसाय करणारे हातगाडीवाले, फळविक्रेते, स्टॉल लावून वस्तू विक्रेते हे रस्त्यावरच आपला व्यावसायिक स्टॉल लावून विक्री करत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. बारामती शहरात विविध खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कायम रस्त्यावरच वाहणांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होती. परिणामी शिवीगाळ, वादविवाद होत होते. या संदर्भात वाहतूक विभागाकडे तक्रारी प्राप्त होत्या. बारामती वाहतूक शाखेने पुढाकार घेऊन बारामती नगरपरिषदेकडील अतिक्रमण विभागाला मदतीला आपल्या सोबत घेऊन रस्त्यावरील स्टॉल, हातगाडे आदींचे अतिक्रमण मागे हटवले. सोबतच नगरपालिकेने तयार केलेल्या पार्किंग कडे जाणारा त्यामुळे हे रस्ते आता खुले झाल्याने वाहतुक आणि पार्किंगचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटण्यास मदत होत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केली असून असून या कारवाईत बारामती वाहतूक शाखेकडील सहाय्यक फौजदार प्रशांत चव्हाण, अशोक झगडे, सुभाष काळे, पो. ह. सचिन वाघ, प्रदीप काळे, म. पो. ह. रुपाली जमदाडे, स्वाती काजळे, सिमा साबळे, माया निगडे, म. पो. ना. सविता धुमाळ, रेश्मा काळे, पो. कॉ. अजिंक्य कदम, योगेश कांबळे तसेच बारामती नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष तोडकर, वरिष्ठ लिपीक सुनील धुमाळ, अतिक्रमण विभागातील किरण साळवे, सागर भोसले, तानाजी कदम, संदीप किर्वे, ज्योतीपान खरात व गणेश शिंदे आदींनी केली आहे.
--------------
अशी घ्या काळजी
बारामती परिसरात छोटमोठ्या विक्रेत्यांनी आपले व्यवसाय करावते मात्र रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. नागरिकांनी सुद्धा नगरपरिषदेने तयार केलेल्या पार्किंगमध्ये वाहने लावावीत त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतूक सुरळीत होईल.
~चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती वाहतूक शाखा..
COMMENTS