सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सध्या शासनातर्फे तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँका तर्फे महिलाना विविध व्यवसायांसाठी नाममात्र दरात मोठमोठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्याचा फायदा ग्रामीण महिलांनी देखील घेतला पाहिजे असे मत दोन विविध बचत गटाच्या अध्यक्षा तसेच उद्योजिका अमरजा आळंदीकर यानी मुरूम येथे व्यक्त केले.
मुरूम ता. बारामती येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ग्रामीण महिलांनी आता चूल आणि मूल संस्कृती मधे अडकून न राहता व्यवसायात उतरले पाहिजे. बचत गटांना शासनातर्फे अनुदान मिळते नाममात्र दारात कर्ज उपलब्ध होतात.स्त्री शक्ती योजनेद्वारे स्टेट बँकेत दोन लाखापासून पंचवीस लाखापर्यंत अगदी कमी दरात महिलांसाठी अनेक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध आहे .याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. प्राध्यापिका कल्याणी जगताप यांनी सध्याची शिक्षण पद्धती व पालकांचे कर्तव्य यासह महिलांनी बचतीकडे कसे लक्ष दिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.फार्मासिस्ट प्राजक्ता खटावकर यानी ताणतणावाची व नैराश्याची शिकार झालेला देश म्हणून जगात दुसरा क्रमांक भारताचा येतो ,त्यासाठी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे मजबूत करता येईल त्यासाठी काय केले पाहिजे सखोल मार्गदर्शन केले . विश्रांती सोनवणे ,कविता गाडे,विद्या भिसे ई महिलांनी देखील यावेळी मनोगते व्यक्त केली.मुख्याध्यापिका संगीता घाडगे यांनी प्रास्ताविक केले, तर शिक्षिका संगीता जाधव ,अलका खोमणे व ज्योती शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समिती यानी कार्यक्रमाचे संयोजन केले .