सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
लोक भाजपा बरोबर राहिलेली नसल्याने मित्रपक्ष व पार्टी फोडण्याचे राजकारण राज्यात सद्या सुरू आहे.युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत,शेतकरी अडचणीत, माता भगिनींचे सुरक्षेचे प्रश्न असताना सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा विरोधक भाजप बरोबर जात आहेत.सध्याची मलिदा गॅंग सत्तेबरोबर असली तरी प्रामाणिक कार्यकर्ते जागेवरच असल्याचे पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भोर तालुक्यातील संवाद यात्रा व संवाद बैठकीदरम्यानच्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार गुरुवार दि.२८ बोलत होते.यावेळी आमदार संग्राम थोपटे,शिवसेना संपर्कप्रमुख (उबाठा)कुलदीप कोंडे, तालुकाध्यक्ष माउली शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल,मानसिंग धुमाळ,माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे ,माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,शहराध्यक्ष यशवंत डाळ,संदीप नांगरे,धरणग्रस्त नेते दिलीप देशपांडे ,बाळासाहेब पारठे, आरपीआय नेते अनिल गायकवाड,माजी नगरसेवक गणेश पवार,सुमंत शेटे,अमित सागळे,चंद्रकांत मळेकर आदींसह महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार पवार पुढे म्हणाले पुरोगामी विचारांबरोबर राहून माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत ज्यांनी सत्ता भोगली त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे असे अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवारांनी टोला लगावला.जनता महाविकास आघाडीबरोबरच असून मतदार संघातील सुज्ञ जनता येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा मित्र पक्षाला धडा शिकवेल.