वाई l झाडांना आगी लावणाऱ्यांवर आता होणार गुन्हा दाखल? वाई व भुईंज बांधकाम विभागाचे पोलिसांना पत्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
रस्त्याच्या कडेच्या झाडांना आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत. ५० वर्षांपेक्षा मोठी झाडे पेटत आहेत. निसर्गाची हानी होत आहे. वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमींनी अशा प्रकारांना आळा घालण्याची वारंवार मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. त्याच अनुषंगाने वाईच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गोंजारी यांनी वाई आणि भुईज पोलिसांना झाडांना आगी लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे विनंतीवजा पत्र दिले आहे. त्यामुळे आता झाडांना आगी लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे सावधान झाडांना आगी लावताय, गुन्हा दाखल होवू शकतो. कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील.
नुकताच पानगळीचा महिना संपला. त्यामुळे प्रत्येक झाडांची पानगळ झालेली पहायला मिळेल, नवीन पालवी फुटलेली झाडांना पहायलाही मिळेल. मात्र, जुनी गळालेली पाने झाडांच्या बुंध्याखाली तशीच आहेत. तो पालापाचोळा रस्त्यालगतच्या झाडांच्या कडेने पेटवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडू लागला आहे. तेच लोण शहरापर्यंत पोहचलेले आहे. वेशेष करुन गेल्या पंधरा दिवसात एकट्या वाई तालुक्यात पाचगणी वाई रस्त्याचे झाड, वाठार फाटा ते जोशी विहिर या रस्त्याकडेचे झाड, वाठार फाटा ते सुरुर या रस्त्याच्या कडेचे झाड, जोर ते वाई ते पाचवड या रस्त्याकडेचे झाड अज्ञाताने पेटवल्याची बाब निदर्शनास आली. पर्यावरण प्रेमींनी लगेच वाई पालिकेच्या अग्निशामक दलाच्या मदतीने झाडांना वाचवण्यात यश मिळवले. मात्र, ही वृत्ती बंद झाली पाहिजे. काळ सोकावता कामा नये, म्हणून वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमींनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग वाई कार्यालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार अशा विघातक घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी व ठोस उपाययोजना करण्यासाठी वाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे आणि भुईज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांना पत्र पाठवून झाडांना आग लावणाऱ्यांचा शोध घेवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आता झाडांना आग लावल्याचे वा झाडाच्या बुंध्याखाली कोणी पालापाचोळा पेटवला तर गुन्हा दाखल होणार आहे.
-------------------
वाई पालिका वाई एसटी स्टॅण्डच्या आगारप्रमुखांवर गुन्हा दाखल करणार का?
वाई एसटी स्टॅण्डमध्ये एक झाड आहे. त्या झाडाच्या खाली दररोज पालापाचोळा पेटवला जातो. त्यामुळे त्या झाडाची पाने करपली आहेत. एकदोन वेळा निसर्गप्रेमींनी त्या कर्मचाऱ्यास हटकले होते. परंतु नित्यनियमाने स्टॅण्डची झाडलोट केल्यानंतर गोळा करण्यात आलेला कचरा बरोबरा झाडाच्या बुंध्यात पेटवला जातो. त्यामुळे वाई नगरपालिकेने अगोदर वाई स्टॅण्डच्या आगारप्रमुखांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होवू लागली आहे.
To Top