सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
काल मध्यरात्री कोऱ्हाळे बुद्रुक येथील काही भागात बराच काळ ड्रोन उडत होते. त्यामुळे लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस दर्शन दुगड यांनी पोलीस प्रशासन याबाबत लक्ष ठेवून आहे. लोकांनी ड्रोनला घाबरून न जाता सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.
काल रात्री कोऱ्हाळे बुद्रुक येथील पेशवे वस्ती, लक्ष्मीनगर, पानगे वस्ती, मुढाळे रस्ता, कॅनल पलीकडील भागात मध्यरात्री तीन ड्रोन उडत होते. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बराच काळ तीन ड्रोन या भागात घिरट्या घालत होते. आता ही तेरा फाटा भागात काही लोकांना ड्रोन दिसले.
याबाबत आता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून आयपीएस दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस याचा कसून तपास करत आहेत. ड्रोन चा वापर करून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून लोकांनी घाबरुन जावू नये,अफवा पसरवू नये. पोलीस प्रशासन लवकरच याचा छडा लावेल. लोकांनी सावधानता बाळगावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलीस प्रशासनाला तात्काळ कळवावे असे आवाहन आयपीएस दर्शन दुगड यांनी केले आहे.