जावली l मेढा परिसरात अवकाळी पाऊसाची हजेरी : हवेत गारवा..नागरीक समाधानी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा आणि परिसरात गेले अनेक दिवस हुलकावणी दाखविणारा अवकाळी पाऊस आज अचानक दुपारी कोसळु लागल्याने हवेत गारवा निर्माण झाला तर रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत होते.
           अनेक दिवस उष्णतेने हैराण झालेल्या मेढावासियांना झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटात दुपारी १ वा. १५ मिनिटांनी पाऊसास सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटा सह पडणाऱ्या पावसाच्या सरी व वाहणारा वारा यामुळे वातावरण थंडगार झाल्याचे चित्र दिसत होते. 
            गत वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि वेण्णा नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.  विहीरी व बोअरवेल (हातपंप) यांच्या पाण्याच्या पातळ्या घटल्या आहेत. आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे नदी पात्रात पाणी वाहणारे नसले तरी विहीर व बोअरवेल मध्ये काही अंशी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरीकां मधुन समाधान व्यक्त केले जात आहे. 
             मेढा आणि परिसरात जवळजवळ एक तास अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरण थंडगार झाल्याने नागरीक समाधान व्यक्त करीत होते. आज पाऊस पडेल उद्या पडेल अशा आशा लावून बसणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचे काम आज पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे झाल्याचे पहावयास मिळते.

To Top