सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील चाळीसगाव खोऱ्यातील दळणवळणाचा महत्त्वाचा असणाऱ्या आंबेघर-चिखलावडे रस्त्यावरील गोसावी आंबा नजीकच्या वळणावर खड्डे पडून पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे.परिणामी या पाण्यातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे.या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे-झुडपे वाहतुकीच्या रस्त्याच्या बाजूला डोकावत असल्याने वाहने चालवताना वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे. दरवर्षी चाळीसगाव खोरे परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसत असतो.पावसाचे पाणी रस्त्यावर येते.ज्या ठिकाणी रस्ता खराब असेल त्या ठिकाणी पाणी रस्त्यावर थांबून राहिल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत असते.यामुळे या रस्त्यावरून दैनंदिन भोर तसेच शिरवळ येथे कंपन्यांमध्ये कामाला जाणाऱ्या-येणाऱ्या वाहन चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात.तर रस्त्याच्या बाजूला कललेल्या छोट्या-मोठ्या झाडाझुडपांचा वाहन चालकांना वाहने चालविताना त्रास होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील पाणी बाजूला जाण्यासाठी तसेच रस्त्याकडे डोकावणारी झाडे झुडपे तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंबेघर- चिखलावडे रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहन चालकांकडून होत आहे.
दोन पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता
भोर तालुक्यातील नागनाथाचे आंबवडे येथील झुलता पूल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला अशा दोन पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी आंबेघर -चिखलावडे रस्त्याचा उपयोग होत असतो.मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने पर्यटकांना नामुष्कीने या मार्गावरून प्रवास करावा लागत असतो. असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
COMMENTS