Baramati News l महेश जगताप l चल यार धक्का मार...! निरा-बारामती रस्त्यावरील शटल बसचा खुळखुळा : एकीकडे कोट्यावधीचे चकाचक बसस्थानक तर दुसरीकडे एक्सपायरी संपलेल्या बसचा वापर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : महेश जगताप
बारामतीचे नाव महाराष्ट्रातच काय आता देशपातळीवर विविध बाबींसाठी गाजू लागले आहे. गेल्याच वर्षी राज्यात कुठेच नाही असे बसस्थानक देखील बांधले आहे. मात्र बारामती बस स्थानकातून लोकल प्रवास चक्क एक्सपायरी संपलेल्या बस वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हणजे नवीन बस शहरातील लोकांसाठी आणि त्याचा खुळखुळा झाला की ती ग्रामीण भागातील लोकांसाठी म्हणजे तुमचा जीव तुमचा आमचा जीव काय रस्त्यावर पडला आहे का? असा सवाल विचारला जात आहे. रोज हजारो विद्यार्थी व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 
                 बारामती आगाराच्या निरा -बारामती मार्गावर प्रवास करणाऱ्या एसटी बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून बारामती मार्गावर निंबुत, वाघळवाडी, पणदरे, बारामती या ठिकाणी बस बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. कामाच्या ठिकाणी वेळेत जाता येत नसलेल्या नोकरदार वर्गांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता नवीन आणि चांगल्या सुस्थितीतील बस देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. एसटी बस मध्येच बंद पडल्याने अनेक प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशावेळी खाजगी वाहन चालक जास्तीचे पैसे घेतात. 
             १५ जून पासून बारामती तालुक्यातील  शाळा- महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी चांगल्या सुस्थितीतील बसची आवश्यकता आहे. बस रस्त्यात बंद पडल्यानंतर दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते. पर्यायाने शाळा- महाविद्यालयात जाण्यास उशीर होतो. राज्यातील सर्वाधिक सुंदर असलेले बारामती आगार विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. निरा- बारामती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे. हजारो विद्यार्थी निरा, सोमेश्वरनगर, वडगाव, कोऱ्हाळे, पणदरे या भागातून बारामतीला शिक्षणासाठी ये -जा करत असतात. याशिवाय बारामती शहर आणि परिसरात चांगली दर्जेदार हॉस्पिटल असल्याने अनेक रुग्णही हॉस्पिटलला येण्या जाण्यासाठी एसटीचा प्रवास सुखकारक मानतात. अनेक महिलाही एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
To Top