सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मान्सूनच्या पावसाने दीर्घ विश्रांतीनंतर रिमझिम सुरुवात केल्याने खरीपातील भात रोपांचे तरवे तसेच कडधान्य पिके तारारली आहेत.दरम्यान पिकांची उगवण जोमात झाल्याने शेतकरी लगबगीने हातकोळप्याच्या साह्याने खुरपणी (पिकांमधील गवत काढणी) करण्यात व्यस्त आहेत.
तालुक्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सर्वत्र मान्सूनच्या पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ वापसा मिळताच खरिपातील पिकांची पेरणी केली.तसेच भात रोपांचे तरवे टाकले होते.मात्र पेरणी झाल्यानंतर दोन दिवसांनी पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसले होते.आठ दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावून रिमझिम पडण्यास सुरुवात केल्याने पिकांची उगवण जोमात झाली.सध्या शिवारांमध्ये घेवडा,भुईमूग,चवळी, मूग ,उडीद,वाटाणा,तर भात रोपं चांगलीच तरारली असल्याने शेतकरी खुरपणी तसेच कोळपणी करीत आहेत.सध्या बरसत असलेल्या पावसाने पुढील काळात अशीच शेतकऱ्यांना साथ दिली तर खरिपातील पिकांचे उत्पन्नात वाढ होणार असल्याचे नेरे ता.भोर येथील शेतकरी अविनाश उभे सांगितले.
पूर्व पट्ट्यात पेरणीची लगबग
तालुक्याच्या पूर्वेकडील सारोळा ,गुणंद, कापूरव्होळ परिसरात मान्सूनच्या पावसाने उशिरा सुरुवात केल्याने खरिपातील पिकांच्या पेरणी आठ दिवस उशिरा सुरू झाल्या.सध्या शेतकरी लगभगिनी पेरणी करीत आहेत.आठ ते दहा दिवस पेरणी उशिरा झाल्याने पिके काढणीस उशीर होणार आहे.मात्र उशिरा पेरणी झाली तरी उत्पन्नात कमालीची वाढ होणार असल्याचे सारोळा ता.भोर येथील प्रगतशील शेतकरी भास्कर धाडवे यांनी सांगितले.
COMMENTS