सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण / खंडाळा : प्रशांत ढावरे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'छप्पर फाड के' पैसे मिळवून देणाऱ्या फुले ०२६५ या ऊस जातीनंतर आता पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने जादा उत्पादन व जादा साखर उत्पादन असलेल्या फुले १५००६ या उस वाणाला परवानगी देण्यात आली.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत गेल्या ९० वर्षा पासून ऊस पिकाचे विविध वाण व ऊसावरील सुधारीत तंत्रज्ञान यावरील शिफारसी देण्याचे काम करीत आहे. राज्यामध्ये अधिक ऊस आणि साखर उत्पादन असणारा नवीन वाण २०२४ मध्ये प्रसारीत करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आले आहे.
५२ वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ७-९ जुन रोजी आयोजीत करण्यात आली होती. या संशोधन केंद्राचा फुले ऊस १५००६ हा नवीन वाण आडसाली, पुर्वहंगाम आणि सुरु हंगामामध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारसीत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ऊस पिकाच्या सुधारीत तंत्रज्ञान शिफारशीमध्ये ऊस बेणेमळयासाठी ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची खते, पूर्वहंगामी ऊस आणि त्याच्या खोडव्याच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीखालील ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाच्या खताचे वेळापत्रक, पूर्वहंगामी ऊस व त्याच्या खोडव्याच्या ऊसाचे व साखरेचे अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ऊसाच्या पानावर फुले द्रवरूप सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी, सुरू ऊसाचे व साखरेचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक अन्नद्रव्यांच्या बचतीसाठी जीवाणूंची बिजप्रक्रिया करणे या चार ऊस पिकाच्या महत्वाच्या शिफारशी प्रसारीत करण्यात आलेल्या.
आजपर्यंत या संशोधन केंद्राने शिफारशीत केलेल्या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशीमुळे शेतकऱ्यांची तसेच साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास महत्वाचे योगदान दिलेले आहे. आपण संशोधित केलेले नवीन वाण शेतकऱ्यांच्या शेतात पाहून शास्त्रज्ञ समाधान व आनंद व्यक्त करत आहे. याकरीता मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी पाडेगाव येथील ऊस विशेषज्ञ, ऊस पैदासकार व सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.
COMMENTS