सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
गेल्या आठ दिवसांपासून बारामती,पुरंदर, दौंड व इंदापूर तालुक्यातील गावांमधून रात्रीच्या वेळी ड्रोन उडताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नक्की हे रात्रीच्या वेळी उडणारे ड्रोन कोणाचे? याबाबत कोणालाच कल्पना नाही. यावर पोलीस अथवा प्रशासन कोणाचं बोलायला तयार नाही.
पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड व इंदापूर या तालुक्यातील काही गावांमधून रात्रीच्या वेळी हे ड्रोन उडताना दिसत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांच्या घिरट्या नागरिकांनी पाहिल्या. त्याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.काही गावातून चोऱ्या वाढल्या त्यामुळे हे ड्रोन चोरटे उडवत आहेत का असा संशय बळावला असून चोऱ्यांची घटना लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. दोनच दिवसापूर्वी वडगाव निंबाळकर आणि मुढाळे परिसरात चोऱ्यांच्या घटना घडल्या होत्या. चोरीच्या या घटनांमागे ड्रोन कॅमेरेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांनी याचा तातडीने तपास करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
बारामती सोमेश्वरनगर, करंजेपुल, वाघळवाडी, शेंडकरवाडी या परिसरात शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान ड्रोन कॅमेरे दिसले. हे ड्रोन कॅमेरे का फिरत आहेत याची पोलिसांनाही कल्पना नाही. त्यामुळे नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. सोशल मीडियावर वारंवार अफवा पसरल्या जात असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. या अगोदर बारामती, पुरंदर,दौंड, इंदापूर तालुक्यात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत होते. त्यानंतर बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात हे ड्रोन कॅमेरे दिसू लागले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याकडून या ड्रोनचा तपास सुरू आहे मात्र यामध्ये यश येताना दिसत नाही. इतक्या रात्री हे ड्रोन नेमकी कशाची टेहळणी करत आहेत याबाबत नागरिकांच्यात उलट सुलट चर्चा आहेत.
---------- ------------
रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणाहून आकाशात ड्रोन उडत असल्याबाबत फोन येत आहेत. यामध्ये बहुतांश ट्रैनिंग विमान आहेत जी रात्रीचा सराव करत आहेत. याबाबत आम्ही विमान कंपनीची चर्चा करत आहोत आणि त्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत. नागरिकांनी अफवा पसरवू नये कोणीही अफवांवर विश्वासही ठेवू नये. ड्रोन द्वारे कुठेही चोरी अथवा इतर कोणताही प्रकार अद्याप घडलेला निदर्शनास आलेलं नाही. नागरिकांनी भिऊ नये. आपल्याच त्याबाबत शंका असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही याबाबत खात्री करत आहोत.
संतोष घोळवे
पोलीस निरीक्षक बारामती शहर
COMMENTS