सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
संपादकीय : महेश जगताप
गेल्या ५०-५५ वर्षापासून बारामती हे राजकारणाचे सत्ता केंद्र म्हणून जन-माणसात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या सत्तेचा रस्ता बारामतीमधूनच जातो आणि सत्ता कोणाचीही असो त्या सरकारमध्ये बारामतीकरांच्या शब्दाला वजनही असतच.
आता नुकतंच राज्यसभेसाठी सुनेत्रा अजित पवार यांनी अर्ज दाखल केला असून त्याची निवड होऊन त्या राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आहेत. या निर्णयामुळे सर्वच बारामतीकरांच्यात उत्साहच वातावरण आहे. याच बारामतीमध्ये आता दोन वरच्या सभागृहात आणि एक लोकसभेत असे तीन खासदार व दोन आमदार, त्यातुन एक उप-मुख्यमंत्री, पालकमंत्रीपद असणार आहे. पवारांना बारामती मधून संपवायची भाषा करता करता... त्याच पवार घरातली सुन आणि मुलगी, असे दोन खासदार बारामतीला मिळाले. आता येत्या दिवसात मंत्रीपद मिळतेय का? हे पहावे लागणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात १९६७ पासून शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नऊवेळा लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. गेल्या ५६ वर्षांपासून शरद पवार यांचे प्राबल्य आहे.
लोकसभेचे बिगूल वाजण्यापूर्वीच पाच महिने बारामतीचा आखाडा तापला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजप - शिंदे गटाशी घरोबा केला. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. अपवाद वगळता ५६ वर्षे सत्तेत असलेल्या शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवार यांनी बारामतीची ओळख देशासह जागतिक पातळीवर नेली आहे. विकासात्मक मॉडेल त्यांनी निर्माण केले. सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठिशी नेहमी राहिली आहे. एक ते दोन वेळा राजकीय वादळे आली. त्यातही त्यांनी बाजी मारली आहे.
राज्यातील समीकरणे बदलल्यानंतर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशा सामन्यात नंदेने बाजी मारली. महाराष्ट्रात सर्वात हाय व्होल्टेज लढत झाली. सुनेत्रा पवार या आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या. पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी असतात. २०१० मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत. बारामती मतदारसंघ हा परंपरागतपणे पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते दिल्लीपेक्षा राज्यात रमले आहेत. १९९१, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशी सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. सुप्रिया सुळे आता पुन्हा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत तर रोहित पवार सद्या विधानसभेत कर्जत जामखेड चे नेतृत्व करत आहेत.