Baramati News l सर्वसामान्य जनता पुढे येण्यास धजावत नाहीत मात्र निवडणुकित कोणते बटन दाबायचे तो बदल मात्र नक्की करते : खा. शरद पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
लोकशाही टिकवण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्येच आहे हे झालेल्या लोकसभा निवडणुकीतुन दिसुन आले आहे. त्यामुळे येत्या चार महिण्यात येणाऱ्या विधानसभेतही बदल घडवुन आणायचा आहे. त्यासाठी तुमची साथ लागणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. 
        सुपे ( ता. बारामती ) येथील पुजा गार्डन येथे झालेल्या जनसंवाद दौऱ्याच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. 
       यावेळी तरूण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्यावतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, तालुकाध्यक्ष ॲड. एस. एन. जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, वनिता बनकर, पोपट पानसरे, हनुमंत चांदगुडे, ऋषीकेश गाडेकर, जाकिर शेख, सचिन लडकत, महादेव भोंडवे आदींसह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काऱ्हाटीच्या माजी सरपंच प्रिती जगताप, ईश्वर लोणकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.        
          यावेळी पवार म्हणाले की, नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे कौटुंबिक कारणामुळे येवु शकल्या नाहीत. त्यांना भरघोस मतांनी निवडुन दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 
      सहसा सर्व सामान्य लोक पुढे येण्यास धजावत नाहीत. निवडणुकित कोणते बटन दाबायचे तो बदल मात्र नक्की करतात. त्यामुळे लोकशाही टिकवण्याची आस्था जनसामान्य माणसात जास्त आहे हे झालेल्या लोकसभा निवडणुकीतुन दिसुन आले आहे. 
        यावेळी येथील शेतकऱ्यांनी जनाईच्या पाण्याबाबत निवेदने दिली. यावेळी पवार म्हणाले की, कारखेल, देऊळगाव रसाळ, कोळोली आणि नारोळी या मार्गे आलो असता त्यांनी बंद पाईपलाईन मधुन पाणी देण्यास विरोध दर्शविला आहे. कालव्याद्वारे पाणी आले तर शिवारात खेळते. त्यामुळे विहिरी, कुपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. जनाई योजना मीच आणली त्यामुळे राहिलेल्या चाऱ्या पोटचाऱ्यांची अपुर्ण कामे मीच पुर्ण करणार असल्याचे सांगितले. 
        सुपे व परिसरातून दुधाचे दररोजचे सुमारे ३० हजार लिटर संकलन आहे. त्यामुळे दुधावर प्रक्रिया करणारे तीन कारखाने येथे आणले. त्यामुळे दोन ते तिन तालुक्यातील १२ लाख लिटर दुधावर प्रक्रिया होत आहे. दुधाचा जोडधंदा प्रपंच चालवण्याकरिता उपयुक्त असल्याने प्रतिलीटर पाच रूपये दर वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र  सरकारने निर्णय घेतला पण पैसे मिळाले नाहीत. यापुढे दुधाची रक्कम वाढवून घेण्याची मागणी करावी लागेल असे पवार यांनी सांगितले.
         तसेच या भागात कांद्याचे पिक जास्त प्रमाणात असते. मात्र केंद्र सरकारने राज्यातील कांद्यावर ४० रुपये निर्यात शुल्क आकारले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात थांबली. येथील कांद्याला बाजारभाव मिळु शकला नाही. तर कर्नाटक, गुजरातच्या कांद्यावर कर आकारला नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्यावर ४० रूपये निर्यात कर बसवला. परिणामी कांद्याची खरेदी थांबली. त्यामुळे येथील सरकार येत्या चार महिण्यात घालवायचे असुन कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. लोकसभेप्रमाणे राज्यामध्ये बदल घडवुन आणायचा आहे. तरच आपली कामे मार्गी लागतील असे पवार यांनी सांगितले.  
         .......................................
To Top