Baramati Breaking l माळेगावच्या कृषि विज्ञान केंद्रातील महिला स्वच्छतागृहात आढळले स्त्री जातीचे अर्भक : तालुक्यात खळबळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------- 
बारामती : प्रतिनिधी       
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील कृषि विज्ञान केंद्रातील महिला स्वच्छतागृहात एक स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आहे. संस्थेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपासही सुरू केला आहे. 
याबाबत माहिती अशी की, कृषि विज्ञान केंद्रातील महिला स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर माळेगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी येत या प्रकाराची माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. 
याबाबत संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा हनुमंत तावरे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीच्या बालकाचा सांभाळ न करता या अर्भकाचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने टाकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून या नामवंत संस्थेत हे अर्भक कोणी आणून टाकले हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.
To Top