सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे ; दीपक जाधव
बारामती तालुक्यातील ३३ गावांचा जिरायती शिक्का कायमचा घालवण्यासाठी १ हजार २५ कोटी खर्चाची नीरा - कऱ्हा उपसा जलसिंचन योजना राबवणार असुन यामुळे ४५ हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बोरकरवाडी ( ता. बारामती ) येथील तलावापर्यंत टीसीएस फाऊंडेशनच्यावतीने सीएसआर फंडातुन सुमारे २ कोटी ८८ लाख खर्चाच्या बंदिस्त पाईप लाईनच्या कामाचे भुमिपुजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील विठ्ठल मंदीरातील सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, जनाई, शिरसाई आणि पुरंधर या उपसा योजनेमुळे तालुक्यातील बराचसा भाग ओलीताखाली आला आहे. मात्र राहिलेल्या मोरगाव, बाबुर्डी, शेरेचीवाडी, काऱ्हाटी, जळगाव क. प. आणि अंजनगाव या नदी काठचा भाग तसेच चौधरवाडी वाकी पासुन ढाकाळे, भिलारवाडी पर्यंतची गावे या नीरा - कऱ्हा नदी जोड प्रकल्पांतर्गत ओलीताखाली येणार आहे. यावर्षी वीर धरण दोनदा भरेल ऐवढे पाणी नदीद्वारे वाहुन गेले आहे. हेच वाहुन जाणारे पाणी तेलंगणाच्या धर्तीवर मोठे वीज पंप टाकुन सात फुटी पाईप लाईनद्वारे दोन टप्यात पाणी उचलणार आहे. त्यामुळे जिरायती भागाला पाणी मिळाल्यास शेती ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जिरायती असणाऱ्या ३३ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या भागावर पुर्वीपासुन असलेला जिरायती शिक्का पुसण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या भागाची आर्थीक सुबत्ता वाढुन राहणीमानही उंचवण्यास मदत होईल. याबाबत मंत्रिमंडळात लवकर मजुरी घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.
जनाईच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बंद पाईप लाईनद्वारे तलावात पाणी सोडण्याची मागणी होती. त्यानुसार बोरकरवाडी तलावापर्यंत बंद पाईप लाईन करण्यात येणार आहे. यासाठी सीएसआर फंडातुन सुमारे २ कोटी ८८ लाख खर्चाच्या कामाचे भुमिपुजन केले आहे. ही पाईप लाईन ३ फुट व्यासाची असुन शेतकऱ्यांच्या शेतातुन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अडथळा न आणता सहकार्य करावे. त्यामुळे टेलपर्यंत पाणी जाईल असे पवार यांनी सांगितले. तसेच दंडवाडी, खोपवाडी या गावांचा अपवाद वगळता बंद पाईप लाईनला कुणाचा विरोध नाही. या दुरुस्तीसाठी जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी मिळुन सुमारे ४२९ कोटी आणि पुरंधरसाठी ५६ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कांद्यातुन दोन पैसे मिळतात, त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी करु नका असेही केंद्रस्तरावर बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हरिभाऊ बोरकर, किरण बोरकर, पोपट खैरे आदींची भाषणे झाली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती अर्बनचे अध्यक्ष सचिन सातव, टीसीएस फाऊंडेशनचे सिद्धार्थ इंगळे, जनाईचे कार्यकारी अभियंता दिगंबर दुगल, करण खलाटे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, पोपट खैरे, हरिभाऊ भोंडवे, निलेश लडकत, अरुण सकट, राजाभाऊ बोरकर, दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवाजी बोरकर यांनी केले. सुत्रसंचालन ॲड. दतात्रय बोरकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत उपसरपंच भानुदास बोरकर यांनी केले. तर सरपंच रुपाली भोसले यांनी आभार मानले.
.........................................