सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील एस.पी.इंजिनिरिंग कॉलेजच्या आवारात भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या वतीने ज्ञान विज्ञान गप्पा उपक्रमांतर्गत 'रूग्णांचे हक्क आणि अधिकार' या विषयावर चर्चा पार पडली. यामध्ये साथी संस्थेचे डॉ. काकडे, शेंडे, डॉ. आरती काकडे, शकुंतला भालेराव यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे होते. याप्रसंगी सोमेश्वर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल जगताप, डॉ. मनोहर कदम, संदीप जगताप, पी. बी. जगताप, सरपंच हेमंत गायकवाड, प्रा. शिवाजीराव शिंदे, अस्मिता कांबळे, ह. मा. जगताप, किशोर हुंबरे, प्रसाद सोनवणे, दौलत साळवे, उषा साळवे, रमजान शेख, राम शिंदे उपस्थित होते. यानिमित्ताने विविध सरकारी आस्थापनांमध्ये निवड झालेल्या नितीन शेंडकर, आकांक्षा हुंबरे, शुभांगी हाके, विशाल मासाळ, ओंकार लकडे, सागर कर्चे यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला.
डॉ. काकडे म्हणाले, आपले सर्व लसीकरण, कुटुंबनियोजन सरकारी व्यवस्थेवर अवलंबून होते. पण नव्वदच्या दशकानंतर पूर्णतः खासगी व्यवस्थेवर अवलंबून आहोत. खासगीसोबत कार्पोरेट हॉस्पिटलचीही ताकद आता खूपच वाढली आहे. हेल्थ टुरिझम दोन टक्क्यांहून अकरा टक्क्यांवर गेले आहे. निती आयोगाच्या आकडेवारीनुसार आरोग्यक्षेत्र उद्योगाचा वाढीचा दर बावीस टक्के आहे. २०२१ साली कोविड काळात ऐंशी हजार कोटींची उलाढाल आहे ती २०२७ पर्यंत दोन हजार कोटींची होणार आहे. नव्वद टक्के कार्पोरेट रूग्णालयाचे मालक डॉक्टर नाहीत तर बडे भांडवलदार आहेत. अनेक ठिकाणी खासदार, आमदारसुध्दा यात गुंतवणुका करत आहेत. अशात आताच्या केंद्रसरकारने परकीय भांडवली गुंतवणुकीसाठी आरोग्य क्षेत्र खुले केले आहे. तसेच सरकारी आरोग्यक्षेत्र खासगीला चालवायला देऊ लागले आहेत. खासगीची ताकद वाढल्याने त्यांच्या विरोधातून राजस्थानमध्ये सार्वजनिक आरोग्य हक्क कायदा मागे घ्यावा लागला. खासगी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता व इच्छा दिसत नाही. ज्या देशात सरकारी आरोग्य व्यवस्था बळकट आहे तिथे खासगीचे वर्चस्व नाही. म्हणून खासगीचे नियमन आणि सरकारी आरोग्यव्यवस्थेचे बळकटीकरण करावे लागेल. कोरोनाकाळात खासगीवर नियंत्रण आणल्याने इतिहासात पहिल्यांदा रूग्णालयांनी लुटलेले पैसे रूग्णांना परत दिले. सरकारी यंत्रणेने स्थानिक पर्यवेक्षण अधिकारी नियमनासाठी नेमावा आणि तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक देऊ तक्रार निवारण कक्षाव्दारे महिन्यात तक्रार सोडवावी अशी आधीच तरतूद आहे. सगळ्या हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात तक्रार निवारण क्रमांक लावावा असा नियम आहे. पण अंमलबजावणी होत नाही.
-----------------
डॉक्टरांना मारहाण
मारहाण होण्याचं सर्वात जास्त प्रमाण भारतात आहे असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. डॉक्टर व रूग्ण या नात्यातील दुभंगलेपण मोठं होत चाललं आहे. अविश्वासाचं नातं तयार होत आहे. ही हिंसा स्वीकारार्ह नाही. परंतु संघटनेने ही हिंसा रूग्ण हक्कांशी संबंधीत आहे असेही म्हटले आहे. सरकारने रूग्ण हक्कांचे नियम पारित करणं गरजेचं आहे. त्यासाठी जनतेचा रेटा पाहिजे, असेही डॉ. धनंजय काकडे, विनोद शेंडे यांनी सांगितले. नौशाद बागवान यानी प्रास्ताविक केले. गणेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर संभाजी खोमणे यांनी आभार मानले.