Baramati News l मी शपथ घेतो की...! समाजातील प्रत्येक मुलींचा व महिलांचा....

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
'माझ्या आईस व संविधानास साक्षी ठेवून शपथ घेतो की, माझ्या आईचा, बहिणीचा मी जसा आदर व सन्मान करतो तसाच समाजातील सर्व मुलींचा तथा महिलांचा मी मनःपूर्वक आदर व सन्मान करेन...' रक्षाबंधननिमित्त सोमेश्वर विद्यालयातील मुलांनी अशी प्रतिज्ञा घेतली.
         बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या वतीने मंगळवारी रक्षाबंधन  व संस्कृतदिन असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. कलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरूणीवर आणि बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या नृशंस व निर्घृण अत्याचाराचा  मुलामुलींकडून आणि शिक्षक-शिक्षकेतरवृंदाकडून जाहीर निषेध करण्यात आला. तसेच नैतिकतेने वागण्याची स्वतःपासून सुरवात व्हावी या उद्देशाने मुलांनी व मुलींनी संकल्पपूर्वक प्रतिज्ञाही घेतली. "शाळेतील व समाजातील मुलींशी, महिलांशी जबाबदारीने वागेन. कधीही मुलींची छेड काढणार नाही, कुणाचीही शारीरिक अथवा मानसिक हिंसा होईल असे वर्तन करणार नाही. इतरांनाही यासाठी प्रवृत्त करेन..." अशी प्रतिज्ञा मुलांनी केली. तर मुलींनीदेखील, "माझा समाजातील चांगुलपणावर विश्वास आहेच मात्र मी कोणावरही अंधविश्वास ठेवणार नाही. स्वतःच्या सुरक्षेस प्राधान्य देईन. मला घरात, रस्त्यात, समाजात, शाळेत शारीरिक अगर मानसिक त्रास झाल्यास आईवडिलांना अथवा शिक्षकांना न घाबरता मनमोकळेपणाने सांगेन..." अशी प्रतिज्ञा केली. राणी शेंडकर व राजेंद्र झुरंगे यांनी स्त्री सुरक्षेबद्दल माहिती देत सदर प्रतिज्ञा घेतल्या. 
यासोबतच राख्या बांधण्याचा व संस्कृत दिनाचा उपक्रमही पार पडला. याप्रसंगी संस्कृत शिक्षक  योगेश महाले यांनी संस्कृतचे महत्त्व विशद केले. शिक्षिका मनिषा खोमणे व शोभा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलींनी स्वतः सातशे राख्या बनविल्या होत्या. त्या राख्या मुलींकडून सहकारी विद्यार्थ्यांना बांधण्याचा समारंभ संपन्न् झाला. त्याचबरोबर वृक्षांना राखी बांधून एक आगळावेगळा वृक्षाबंधन कार्यक्रम सुभाष तिटकरे आणि विभावरी गायकवाड यांच्या मदतीने मुलांनी केला. याप्रसंगी मुख्याध्यापक पी. बी. जगताप सर, पर्यवेक्षक डी. जे. निगडे सर उपस्थित होते. संस्कृत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, सुभाषिते, मनोगत संस्कृत भाषेतून सादर केले. तृप्ती मिंड व वर्षा कदम यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहल जगताप यांनी आभार मानले.
To Top