सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संरोष म्हस्के
भोर तालुक्यात सर्वदूर शुक्रवार दि.२३ सायंकाळपासून पुन्हा एकदा वरूनराजाने मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने शेती, ओढे-नाले तुडुंब होऊन वाहू लागले आहेत.तर मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यंदा वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकांना पोषक वातावरण आहे.परिणामी खरिपातील पिके जोमात येऊ लागली आहेत. मागील आठवड्यात दोन दिवस वगळता पाऊसाची रिपरिप सुरू होती.मात्र शुक्रवारपासून सायंकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पुन्हा एकदा सर्वत्र पाणी पाणी झाले आहे.खरिपातील पिकांच्या शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.तर निरा- देवघर व भाटघर धरण क्षेत्रामध्ये जोरदार सरींवर- सरी बरसत असल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ होत चालली आहे. त्यामुळे नीरा - देवघर धरणातून ७५० क्यूसेक्स तर भाटघर मधून पाण्याचा २३ हजार क्यूसेक्सने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे.पावसाचा जोर कायम असल्याने नीरा नदी पात्राशेजारील गावातील लोकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.तसेच भोर शहरातील मंगळवार पेठेत अतिवृष्टीत एका घराची भिंत कोसळली.यामध्ये दुकानदार शब्बीर पापा भाई आतार यांचे घर साहित्य व दुकानातील वस्तूंचे
अतोनात नुकसान झाले.
------------------
दूषित वातावरणात, रुग्णांची संख्या वाढली
दोन दिवसांपासून भोर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी खेडोपाडी तसेच शहरात दुख्याची चादर पसरत असल्याने सर्वत्र दूषित वातावरण आहे.परिणामी दूषित वातावरणातील गारव्याने अबाल,वृद्ध रुग्णसंख्या वाढली आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे असे तालुक्यात चित्र आहे.