सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात गेल्या वीस दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने शेतक-याच्या चितेत भर पडली आहे. खरीपातील उगवून आलेल्या पिकांची सततच्या पावसाने वाढ खुंटली असून पिके पाण्यात असल्याने सडून चालली आहेत. तर पिकावर रोगराईचे प्रमाणही वाढले आहे.पिकांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नसल्याने उगवून आलेली पिके पिवळी पडू लागली आआल्याने भोर तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
जोरदार वारा तसेच अतिवृष्टीमुळे भुईमुग,सोयाबीन, घेवडा,उडीद, चवळी, मूग या पिकावर परिणाम झाल्याने तंतुमुळे पावसाने तग धरत नसल्याने पिके कोलमडण्यास सुरूवात झाली आहे.पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीतील पिके कुजू लागली आहेत.तर शेंडयापर्यंत पाण्यात बुडालेली पिके जळून जाण्याचे चित्र आहे. पिकांना नत्राचे प्रमाण कमी झाल्याने वाढ खुटली असून जोमात आलेल्या पिकांची नासाडी होणार या भितीने शेतक-यांची चिंता वाढली आहे.यंदा होत असलेल्या अतिवृष्टीने पिकांसाठी शेतात केलेली मशागत, बियाणे, मजुरी, औषधे फवारणी याचा हजारो रुपये खर्च वाया जाणार आहे.पिके हातातून जाणार असल्याने पावसाने शेतकऱ्यावर आस्मानी संकट ओढवले आहे.आधीच कर्जबाजारी शेतकऱ्याची आर्थिक घड़ी पूर्णपणे विस्कळीत आहे.त्यातच अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीने शेतकरी मेटाकोटी साला आहे.शासन दरबारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांकडून होत आहे.
-----------------
पावसाच्या उघडीपीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
यंदाची अतिवृष्टी शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरली असून पावसाचे पाणी उभ्या कडधान्य पिकांच्या शेतीमध्ये पूर्णपणे साचलेले असल्याने पिकांची मुळे कुजून गेली आहेत.परिणामी पिके वाया गेली आहेत. पुढील दोन दिवसाच्या आत पावसाने उघडीप दिली तरच पिके वाचतील अन्यथा ओला दुष्काळ पडण्याची चिन्ह आहेत.असे धावडी येथील शेतकरी संपत दरेकर यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना सांगितले.