सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन असणे, नेट न मिळणे, रेशन वाटपातील अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदारांनी तहसीलदार हणमंत कोळेकर यांना निवेदन दिले.
यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या जावली तालुका अध्यक्ष राजेंद्र भिलारे ,उपाध्यक्ष संजय पवार ,किशोर शहा, प्रदिप आढाव , माजी.अध्यक्ष शशिकांतजी शेलार, सुजित धनावडे व सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.
यावेळी ई-पॉस प्रणालीच्या निषेधार्थ ९५ बंद ई पॉस मशीन जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना सुपूर्द केल्या. मात्र समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला. केंद्र सरकारने रेशन अन्नधान्य वाटपातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे ऑनलाईन वाटपाची पद्धत आणली. परंतु, मशीनच चालत नसल्याने ही प्रक्रिया ठप्प पडली आहे.
रेशन दुकानदारांनी दिलेल्या निवेदनात इंटरनेट सेवा गतिमान करावी, सर्व्हरचा प्रश्न सोडवावा,
५०० रुपये प्रतिक्विंटल कमिशन मिळावे, मशीन अनेकदा अंगठ्याचा ठसा घेत नाही ही समस्या सोडवावी , दुकानदारांना केवायसीची परवानगी द्यावी, ऑफलाइन वाटप करण्याची परवानगी मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.