सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली (ता.बारामती) ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथ जयसिंग जगदाळे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच असताना आर्थिक हितसंबंध जोपासले प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य विद्या भापकर यांच्या तक्रारीनुसार झालेल्या चौकशीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जगदाळे नोव्हेंबर 2022 मध्ये अपात्र झाले होते .त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपीलामुळे ते एप्रिल 2023 मध्ये पात्र ठरले होते मात्र, अर्जदार विद्या भापकर यांनी या निर्णयास व्यथित होऊन उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे उच्च न्यायालयाकडून फेर चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना १५ डिसेंबर 2023 मध्ये देण्यात आले. झालेल्या फेर चौकशीत जगदाळे यांनी ग्रामपंचायत कामकाज करताना आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने नवनाथ जगदाळे पुन्हा 10 सप्टेंबर 2024 रोजी अपात्र झाले आहेत.
२०२१ मध्ये नवनाथ जगदाळे हे सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची पत्नी चालवत असलेल्या स्वतःच्या दुकानातून गणवेश खरेदी केला होता. ग्रामपंचायत पदाधिकारीपदी कार्यरत असताना जगदाळे यांनी त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या असलेल्या शुभम साडी डेपो या दुकानातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चेक क्र. ५००५४०अन्वये ११९५० रूपयांचे गणवेश खरेदी करुन पत्नीच्या नावे चेक काढला होता . तर ग्रामपंचायत सदस्य अश्विनी श्रीकांत गाडे यांचे पती श्रीकांत दत्तात्रय गाडे यांच्या नावे कोरोना काळात टाकी साफ करणे, वृक्ष लागवड व इतर किरकोळ कामाचे ५४०० रुपयांचा चेक काढण्यात आला होता. यामुळे ग्रामपंचायत सदस्य विद्या हनुमंत भापकर, संतोष संपत चौधरी, स्वाती सतीश गायकवाड यांनी बारामती गट विकास अधीकारी ते जिल्हाधिकारी पुणे यांकडे ग्रामपंचायत पदाधिकारी असताना आर्थिक हितसंबंध जोपासल्याचे कारण पुढे करत जगदाळे व गाडे यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करण्यात यावे असा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. जिल्हाधीकाऱ्यांनी चौकशीनंतर जगदाळे व गाडे यांचे पद रद्द केले होते. जगदाळे व गाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे या निर्णयाविरोधात अपील केले होते . विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल रद्द करत जगदाळे व गाडे यांना पात्र केल्याचा आदेश दिला होता. या आदेशाने व्यथित होऊन विद्या भापकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती . यामध्ये उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाला फेरबाजू मांडण्याची संधी द्यावी व फेरचौकशी करुन निकाल द्यावा असा आदेश १५ डिसेंबर २०२३ रोजी दिला होता.
यानुसार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरु असलेल्या दाव्याचा निकाल आदेश पारित केला. जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोघांना बाजू मांडण्याची संधी दिली . यावर निकाल देताना जगदाळे यांच्या शुभम साडी डेपो या दुकानातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश खरेदी केली असून हे साडी सेंटर नवनाथ व त्यांच्या पत्नीचे चालवत असल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ग हे कारण पुढे करीत ते कारवाईस पात्र आहेत असा आदेश दिला. यानुसार नवनाथ जगदाळे यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र केले आहे. तर कोरोना काळात अश्विनी गाडे यांचे पती श्रीकांत दत्तात्रय गाडे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे चेक काढले असल्याने त्याबद्दल सहानुभूती दाखवत त्यांच्यावर असणारे अपात्रतेची टांगती तलवार बाजूला झाली तर जगदाळे यांना ग्रामपंचायत मध्ये आर्थिक हितसंबंध ठेवल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे
अर्जदार विद्या भापकर यांच्या वतीने ॲड . हेमंत भांड पाटील यांनी युक्तिवाद केला.
यासंदर्भात नवनाथ जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची त्यांनी सांगितले.
COMMENTS