Baramati Breaking l उपमुख्यमंत्र्याच्या तालुक्यातीलच लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित : शासनाच्या आदेशाला बॅंकेची केराची टोपली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
बारामती - प्रतिनिधी 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने थेट महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यासाठी लाभाची रक्कम कोणत्याही थकीत कर्जात समायोजित करू नका, थकीत कर्जामुळे गोठवलेली खाती तात्काळ सुरू करा असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना कोऱ्हाळे बुद्रुक येथील युनियन बॅंक ऑफ इंडिया लाभार्थी महिलांची गोठवलेली खाती सुरू करत नसल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे.
      सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय होत आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेचे जोरदार ब्रॅंडिंग करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही महत्वकांक्षी योजना असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ही योजना शेवटच्या महिलेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या असहकारामुळे लाभार्थी महिलांना खात्यात रक्कम जमा असूनही पैसे काढता येत नाहीत.
        उपमुख्यमंत्री अजित पवार लाभ आणि बळ या टॅगलाईन खाली ही योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावातील मजूर महिला लाभा विना वंचित आहेत.
      सहा वर्षांपूर्वी एका ठगाने व्यवसायासाठी मदत करतो म्हणत या महिलांची कागदपत्रे व स्वाक्षरी घेत त्यांचे नावे अजित मल्टिस्टेट सोसायटीचे प्रत्येकी वीस हजारांचे कर्ज काढून पोबरा केला. न काढलेले कर्ज भरता न आल्याने युनियन बॅंकेने या महिलांची खाती गोठवली आहेत. योजना जाहीर होताच अनेक मजूर महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले. ते मंजूर होवून खात्यात रक्कम जमाही झाली मात्र खाती गोठवण्यात आली असल्याने खात्यात रक्कम असुनही ती काढता न आल्याने ऐन सणासुदीत महिलांना निराश होवून बॅंकेतून माघारी परतावे लागले. 
   महिलांना लाभ मिळत नसल्याचे लक्षात येताच शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या समन्वयकांना स्पष्ट निर्देश देत पत्र काढले आहे. त्यामध्ये लाभाची रक्कम कोणत्याही थकीत कर्जात समायोजित करू नये, लाभार्थी महिलांना थकबाकीच्या कारणामुळे रक्कम काढण्यास नकार देवू नये, कोणत्याही कारणास्तव गोठवलेली बॅंक खाती तात्काळ सुरू करण्यात यावी असा स्पष्ट सूचना दिल्या असताना कोऱ्हाळे बुद्रुक गावतील युनियन बॅंक ऑफ इंडिया या महिलेंची खाती सुरू न करता शासनाच्या निर्देशाचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. याबाबत महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले असून या महिलांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी अशी मागणी आहे. 
---------------
शेजारील इतर महिलांनी योजनेची रक्कम बॅंकेतून काढून आणल्याचे कळताच मी बॅंकेत गेले होते. मात्र बॅंकेने तुमचे खाते फ्रीज असून पैसे काढता येणार नाहीत असे सांगितल्याने ऐन रक्षाबंधनाच्या सणाला अजित दादांनी पाठवलेली ओवाळणी मला मिळाली नाही…..
बेबी मारुती सोनवणे 
--------------
योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याच्या मेसेज मोबाईलमध्ये आल्याने मी आनंदित होवून बॅंकेत गेली मात्र बॅंकेने खाते फ्रीज असल्याचे सांगत पैसे दिले नाहीत. त्यांना विनंती करूनही खाते सुरू केले नाही….. 
सारिका कैलास चव्हाण 
----------------
मी काही वर्षांपूर्वी भारत फायनांस या खाजगी बॅंकचे कर्ज काढले होते. त्याचा भरणा ही वेळेवर केला होता. मात्र आणखी कर्ज देतो म्हणत तिथला अधिकाऱ्याने अंगठा नेला. कर्ज ही दिले नाही. आता या योजनेची रक्कम युनियन बॅंकेने परस्पर माझे खाते इंडसंड बॅंकेत 
 पाठवले. मला या योजनेतून अद्याप एक रुपया ही मिळाला नाही…..
ताई माणिक चव्हाण
To Top