सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
युवतीशी मैत्री केल्यामुळं तिघांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडला आहे. या मारहाणी संबंधित युवकाची कवटी फुटली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
माळेगाव पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय बाळासाहेब जाधव (वय २९, रा. माळेगाव, ता. बारामती) असं या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील बाळासाहेब लक्ष्मण जाधव यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, अक्षय जाधव याची एका युवतीशी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात मैत्री झाली होती. ही बाब खटकल्यामुळे यश राजेंद्र कांबळे, अमित अविनाश कांबळे (दोघे रा. खांडज) व उत्कर्ष दत्तात्रय भोसले (रा. माळेगाव) आणि आणखी तीन अनोळखी व्यक्तींनी त्याला दुचाकीवर बसवून माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मागील बाजूस असलेल्या निरा डाव्या कालव्याजवळ असलेल्या रिकाम्या जागेत नेले.
त्या ठिकाणी आधीच तिघेजण थांबलेले होते. त्यानंतर सर्वांनी मिळून अक्षयला बेदम मारहाण
केली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याची कवटी फुटली आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून या घटनेनंतर माळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अक्षयचे वडील बाळासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून यश कांबळे, अमित कांबळे आणि उत्कर्ष भोसले या तिघांसह एकूण
सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेगाव पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
-------------------
वडिलांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र---
दादा......
माझा मुलगा अक्षय बाळासाो जाधव हा माळेगाव याठिकाणी पोलीस भरती अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. अॅकॅडमीमध्ये मुले व मुली हे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होतो यामधीलच एका मुलीचा वाढदिवस असलेकारणामुळे माझ्या मुलाने मोबाईलमध्ये वाढदिवस केलेला फोटो स्टेटसला ठेवला. मुलीचा फोटो स्टेटसला ठेवल्याचा राग मनात ठेवून खांडज येथील यश राजेंद्र कांबळे, अमित अविनाष कांबळे, उत्कर्ष दत्तात्रय भोसले तसेच इतर ३ अनोळखी इसमांनी त्याला बोलावून घेतले. सदरचे आरोपी हे दारु व गांजा पिलेले होते. त्यांनी माझ्या मुलास अमानुष मारहाण केली यामध्ये त्याच्या डोक्याला व हाताला जबरी मारहाण झालेली आहे. त्याचेवर रुबी हॉस्पीटल, पुणे याठिकाणी उपचार सुरु आहेत. मेंदूच्या कवटीच्या भागाचा चुरा झालेला असून त्याजागी आर्टिफिशियल कवटी बसविण्यासहित मेंदुचा भाग सरकलेला आहे व त्याचा डावा हात पुर्णपणे निकामी झालेला आहे. या सर्व उपचारासाठी जवळपास १६ ते १८ लाख रुपये खर्च येत असून यापैंकी दि.१२/०९/२०२४ अखेर ५० टक्के रक्कम हॉस्पीटल प्रशासनाकडे जमा केलेली आहे.
माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मी मोलमजूरी करुन माझ्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत आहे अशा परिस्थितीमध्ये एवढा मोठा आर्थिक खर्च मला पेलू शकत नाही. यासाठी मला आपणामार्फत आर्थिक मदत व्हावी किंवा हॉस्पीटल प्रशासनास बीलाबाबत सुचना व्हाव्यात ही विनंती. वरील आरोपीपैंकी काही आरोपी अद्यापर्यंत फरार असून मुख्य आरोपी अटक आहेत व त्यांचेवर एकदम साध्या पद्धतीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी सदर इसमांवर कठोर कारवाई करणेबाबत संबंधीतांना आपले आदेश होणेविषयी नम्र विनंती आहे.
COMMENTS