Purandar News l विजय लकडे l दोन्ही ठेकेदाराने काम न करता अधिकाऱ्यांशी संगनमत करून दफनभूमीच्या कामात मलिदा खाल्ला : मुस्लिम बांधव व ग्रामस्थांचे आंदोलन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
निरा ( ता.पुरंदर) येथील पुणे - पंढरपूर रोडवरील मुस्लिम समाजाच्या दफनभुमीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दफनभूमी सुशोभीकरण करणे व जि.प.च्या २५१५ या हेडखाली  सुमारे वीस लाख रूपयांची विकास कामे झालेले आहेत. माञ दोन्ही ठेकेदाराने काम न करता अधिका-यांशी संगनमत करून खोटी व बनावट एम.बी. तसेच तत्सम कागदपञ तयार करून त्याआधारे मंजुर शासकीय निधीचा अपहार केला आहे. निरा येथील दफनभूमी सुशोभीकरण करणे या विकासकामामध्ये झालेल्या अनियमितता याच्या चौकशीसाठी आंदोलनकर्ते अकबर सय्यद,अन्वर शेख, मुस्लिम बांधव व अन्य नागरिकांनी निरा येथील दफनभुमीच्या प्रवेशद्वारा समोर बुधवारी दि.११ रोजी एकदिवसीय आंदोलन केले. 
       निरा ( ता.पुरंदर) येथील दफनभुमी सुशोभीकरण करणे या विकासकामासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दहा लाख रूपये, तसेच दफनभुमी सुशोभीकरण करणे या विकासकामांसाठी शासनाच्या निधीतून २५१५ या हेडखाली पुणे जिल्हा परिषदेमार्फत दहा लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला.एकाच कामासाठी वेगवेगळ्या हेडमधून निधी मंजुर करण्यात आला. आंदोलन कर्त्यांनी विकास कामामध्ये अपहार व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वरिष्ठ अधिका-यांकडे करण्यास सुरूवात केल्यानंतर ठेकेदाराने पुर्णत्वाचा दाखला व बिलाकडे दुर्लक्ष करून जुजबी रंगरंगोटी व किरकोळ काम केले. याबाबत संबंधित ठेकेदार व  बांधकाम विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना वेळोवेळी कामाच्या ठिकाणी जाऊन शासन मंजुरी प्रमाणे , इस्टीमेटप्रमाणे व एम.बी.प्रमाणे केलेेेले काम नागरिकांना दाखविण्याची वारंवार विनंती करूनही संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिका-यांनी दाखविले नाही. तसेच पुणे जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ३१ मार्च २०२३ रोजीच संपुर्ण कामाचे बिल ठेकेदारास अदा केले .
 दोन्ही ठेकेदारांनी काम न करता अधिका-यांशी संगनमत करून खोटी  व बनावट कागदपञे  तयार करून त्या आधारे मंजुर शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप  आंदोलनकर्ते अकबर सय्यद यांनी केला‌ आहे. 
   आंदोलकांनी‌ निरा येथील दफनभुमीच्या सुधारणा व सुशोभीकरण कामांमध्ये झालेली अनियमितता व भ्रष्टाचा-याची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत वरिष्ठ अधिका-यांची‌ समिती स्थापन करण्यात यावी. विशिष्ट मुदतीमध्ये निरा ( ता. पुरंदर) येथील दफनभूमी सुशोभीकरण 'या विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची‌ कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित‌ करण्यात यावे व जबाबदार ठेकेदाराकडून अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्यात यावी. शासकीय निधीचा अपहार करण्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांनी ‌ संगनमताने खोटी व बनावट एम.बी.व बिले व तत्सम कागदपञ तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागण्या केल्या आहेत.
            निरा येथील दफनभूमीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनासाठी अकबर सय्यद,अन्वर शेख, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, महेश जेधे,‌ रशीद सय्यद, हसन कुरेशी, शफीक कुरेशी, अस्लम सय्यद, अनामुल्लाखान डांगे,  मुन्ना डांगे, अमोल साबळे, दयानंद चव्हाण, गणेश गडदरे, रईस शेख, हारूण बागवान यांनी सहभाग नोंदवला.
           आंदोलनस्थळी पीएसआय सर्जेराव पुजारी , पोलिस कर्मचारी रविराज कोकरे, संतोष मदने, निलेश करे यांनी भेट दिली.
------------------------
पंचायत समितीच्या अधिका-यांचे लेखी आश्वासन 
निरा येथील दफनभुमीच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत नेमलेल्या राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्यामार्फत करण्याचे लेखी आश्वासन पुरंदर पं.स.च्या बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष नलवडे यांनी आंदोलनकर्त्यांची समक्ष भेट घेऊन दिले. यावेळी पं.स.च्या बांधकाम विभागाचे सुबोध सुरवसे, जयदीप बुरूंगले उपस्थित होते.
To Top