सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी अंतर्गत असणाऱ्या मांगोबाचीवाडी येथील पोपट गणपतराव खैरे यांनी खडकवासला प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित खैरे यांची कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली होती.
मात्र जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या असणाऱ्या १२ मागण्यांपैकी १० मागण्या प्रलंबीत आहेत. त्या अद्यापही पुर्ण झालेल्या नाहीत. ही रखडलेली कामे मी अद्याप पुर्ण करु शकलो नाही. या कारणाने खडकवासला कालवा सल्लागार पदावर राहण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे.
यासंदर्भात खैरे यांनी जलसंपदा विभाग पुणे पाठबंधारे मंडळाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयात राजीनामा मंजुर करण्याचे पत्र दिले आहे.
जनाईच्या पाण्यासाठी जानेवारी महिण्यात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कालवा सल्लागार समितीवर जनाई योजनेच्या भागातील एक सदस्य घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामिण भागातुन पहिल्यांदाच कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी खैरे यांची निवड करण्यात आली होती.
खैरे यांच्यावर खडकवासला अंतर्गत येणाऱ्या जनाई योजनेच्या पाणी वाटपाच्या नियोजनाची मोठी जबाबदारी आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागातील जिरायती हा शब्द पुसुन टाकणार असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नसुन या कामाचा पाठपुरावा करुनही प्रलंबीत कामे अद्याप पुर्ण होवु शकत नसल्याने खैरे यांनी राजीनामा दिला आहे.
....................................