सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दुर्गम- डोंगरी भागातील गरीब व आदिवासी कुटुंबातील २०० कुटुंबामध्ये दिवाळी साहित्याचे किट वाटप करून गोरगरिबांची दिवाळी गोड केली.पंधरा-सोळा वर्षापासून ध्रुव प्रतिष्ठान गरीब व गरजू कुटुंबांसाठी हा उपक्रम राबवत आहे अशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.
दिवाळी साहित्यामध्ये ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, आकाश कंदील, तसेच रवा, चिवडा मसाला, बेसन पीठ, साखर, भाजके पोहे, तेल तूप, मोतीसाबण , सुगंधी उटणे, सुवासिक तेल बाटली, काजू, बदाम, बेदाणा,शेंगदाणे इत्यादी प्रकारचे साहित्य होते. टिटेघर -वडतुंबी, म्हाकोशी, अंबवडे, नाझरे झुलता पूल, नाटंबी, भोर - मांढरदेवी रस्त्यावरील कातकरी वस्ती आधी ठिकाणी याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आकाश कंदील करण्यासाठी मनीषा केळकर व राजीव केळकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच साहित्य वाटण्यासाठी योगीराज केळकर, राहुल खोपडे, प्रीतम शिंदे, श्रेयस नवघणे, आदित्य नवघणे यांचे सहकार्य लाभले.भविष्यामध्ये प्रत्येक आदिवासी वस्तीवर आधुनिक रात्र अभ्यासिका चालू करणार असल्याचे राजीव केळकर यांनी सांगितले.ध्रुव प्रतिष्ठानमुळे आंबवडे खोऱ्यातील आदिवासींची दिवाळी गेल्या पंधरा वर्षापासून गोड होत असते अशी प्रतिक्रिया आदिवासी वस्तीतील विजय मुकणे यांनी दिली.