हुडहुडी वाढली ! राज्यातील 'या' तालुक्यात हंगामातील नीचांकी ८.३ किमान तापमानाची नोंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निफाड : प्रतिनिधी
निफाड तालुक्यात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत चालला आहे. निफाडजवळील कुंदेवाडी येथे आज बुधवारी या हंगामातील नीचांकी ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे पहाटे आणि रात्री येथे गारठल्यागत स्थिती होती.

द्राक्ष पंढरीत तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या जिह्यात किमान तापमान ८ ते १२ अंशांदरम्यान आहे. ते आणखी खाली घसरल्यास द्राक्षबागांसाठी धोकादायक ठरू शकते. तर पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेत हिमालयात बर्फ वृष्टी सुरू असल्याने तापमान चांगलेच घसरले आहे.
        मागील वर्षी ऑक्टोबरअखेर थंडीची चाहूल लागली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात आधी अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर दिवाळीत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस होते. पुढे महिनाअखेरीस पुन्हा अवकाळी पावसासह गारपीटीचा फटका बसला, त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरू होती. त्यातुलनेत यावर्षी थंडीचा कडाका डिसेंबर आधीच वाढला आहे. निफाड येथे १७ नोव्हेंबर रोजी १५.५ अंशांवर पारा घसरला. त्यानंतर त्यात वाढ झाली होती, बुधवारी पुन्हा तो ८.३ वर खाली आला. येथे कमाल तापमान २७.८ नोंदवले गेले. दिवसभर थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका कायम होता. यामुळे उबदार कपडय़ांचा तसेच शेकोटीचा नागरिकांना आधार घ्यावा लागला.
To Top