निवडणुकीची रणधुमाळी थांबली : जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाने घेतला वेग

बारामती : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभेची रणधुमाळी आता संपली असून मतदान उरकून ऊस तोडणी कामगार आता साखर करखान्यावर दाखल होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील निम्म्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात सात साखर कारखान्यांनी ५ लाख ५९ हजार ३७२ में. टन ऊसाचे गाळप ९. ३३ च्या सरासरी साखर उताऱ्याने  ३ लाख ५९ हजार ५६५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 
      विधानसभा निवडणुका असल्याने राज्यभरातील जवळपास निम्म्याहून अधिक ऊस कामगार कारखाना कार्यक्षेत्रात दाखल झाले नव्हते. निवडणुका पार पडल्यानंतर ऊसतोड करणारी संपूर्ण यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल झाल्या आहेत. यावर्षी मंत्री समितीने कारखाने उशिरा सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यात नाराजीचा सूर होता. अनेक कारखान्याने ऊसतोड यंत्रणा १५ नोव्हेंबर पर्यंत कारखान्यावर कशी दाखल होऊल यासाठी शेतकी विभागाने जीवाची पराकाष्ठा केली. त्यामुळे अनेक कारखाने १५ नोव्हेंबर पर्यंत ६० ते ७० टक्के ऊसतोड यंत्रणा कारखान्यावर आणण्यात यशस्वी झाले होते. तर आता उर्वरित करार केलेली ऊसतोड यंत्रणा कारखान्यावर दाखल होत आहे. १ डिसेंबर पासून साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील. 
         सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. सुरुवातीला कारखान्याने करारबद्ध केलेली ७० टक्के यंत्रणा कारखाना परिसरात दाखल झाली होती. उपलब्ध झालेल्या यंत्रणेवरच गेल्या दहा दिवसांपासून हंगाम सुरू होता मात्र संपूर्ण यंत्रणा दाखल झाल्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाने वेग घेतला आहे. ऊसतोडणी सुरू झाल्याने उसाने भरलेली वाहने कारखाना कार्यस्थळावर दाखल होत आहेत. 
                कारखान्याने गाळपाचा ७६ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामात १३ लाख मेटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सोमेश्वर कारखान्याने आजअखेर ९.४२ चा सरासरी साखर उतारा राखत ७६ हजार मेटन ऊस गाळप करत ६८ हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. कारखान्याकडून सुरुवातीला सभासदांच्या ऊस गाळपास प्राधान्य देण्यात येत असून दोन महिन्यानंतर गेटकेन ऊस गाळपास आणला जाणार आहे. ११५० बैलगाडी, ३८० ट्रक -ट्रॅक्टर, २६० डंपिंग आणि २० हार्वेस्टर अशी यंत्रणा ऊस गाळपास करारबद्ध केली आहे. पंधरा दिवस हंगाम उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. एक नोव्हेंबरला हंगाम सुरू झाला असता तर आत्तापर्यंत राज्यातील सर्वच कारखान्याचे एक लाखाहुन अधिक गाळप पूर्ण झाले असते. उशिरा हंगाम सुरू झाल्याने २० एप्रिल पर्यंत हंगाम लांबण्याची शक्यता आहे. कारखाना कार्यक्षेत्रात हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने आणि हंगाम उशिरा सुरू झाल्याने टनेजमध्ये घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे याशिवाय दुबार पिके घेता येणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
To Top