पुरंदर l सुराज सामाजिक संस्थेमार्फत पिंपरे येथे जागृती व्याख्यानमालाचे आयोजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी   
पिंपरे खुर्द ता. पुरंदर येथे सुराज सामाजिक संस्था यांनी दोन दिवसीय जागृती  व्याख्यानमालेचे  आयोजन  केले होते .
        सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी प्रा.वैभव गणेश सोनोने यांचे पहिले व्याख्यान झाले, विषय होता ग्रामीण विकास व युवकांचे योगदान..युवकांनी शहराकडे जाण्यापेक्षा ग्रामीण भागातच आपला विकास घडून आणावा असे त्यांनी कथन केले .शहराचा विकास करावयाचा असल्यास ग्रामीण विकास सर्वप्रथम करणे गरजेचे आहे .शहराला लागणारा सर्व कच्चा माल हा ग्रामीण भागातच निर्माण होतो त्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन खेडी विकसित केली पाहिजेत असे त्यांनी प्रतिपादन केले .
          भारत हा तरुणांचा देश आहे मात्र कालांतराने तो वृद्धांचा देश होणार असून त्यासाठी आत्ताच सर्वांनी आपलं भविष्य ठरवणे गरजेचे आहे .कोरोना कालावधीमध्ये सर्व लोक ग्रामीण भागाकडे वळले होते .त्यांना ग्रामीण भागाचे महत्व समजले होते व बरेचसे लोक अभ्यासपूर्ण शेती करून लाखो रुपये कमवून स्वतःबरोबर इतरांचाही आधार बनत आहेत .महात्मा गांधीजींचा विचार खेड्याकडे चला हा सर्वांनी अंगीकारला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले .अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ.पी एच कदम( प्रा. मुधोजी कॉलेज) फलटण हे होते . आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी ग्रामीण विकास आणि युवकांचे योगदान याचे महत्त्व सांगितले .संस्थेमार्फत या दिवशी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा यात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला सत्काराचे स्वरूप मानचिन्ह, वृक्ष व पुस्तक हे होते .
    मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते व्याख्याते प्रा. सतीश शेंडे होते,विषय होता शिवरायांचे गड किल्ले .अध्यक्ष स्थानी लक्ष्मण नामदेव थोपटे पिंपरे खुर्द( सिनियर प्रोडक्शन मॅनेजर, आचार्य ग्रुप ऑफ कंपनी, शिर्डी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई) हे होते .परिसरातील विद्यार्थ्यांना गडकिल्ले विषयाची माहिती व्हावी शिवरायांचे कर्तृत्व माहित व्हावे त्यांची मातीशी नाळ जोडली जावी यासाठी गावांमध्ये सुराज सामाजिक संस्थेमार्फत किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये एकूण 25 किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले .क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले . तसेच पिंपरे खुर्द येथील प्राथमिक शाळेने शासकीय किल्ला स्पर्धा आयोजनात उल्लेखनीय सहभाग घेतला होता त्यांचा ही सत्कार या वेळी करण्यात आला .
       व्याख्याते सतीश शेंडे यांनी विविध गड किल्ले यांची माहिती त्यावर शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची माहिती सांगितली . शिवरायांचा इतिहास हा सर्व लोकांना माहीत व्हावा यासाठी अभ्यासक्रमामध्ये याचा उल्लेख असणे गरजेचे आहे .असेही त्यांनी यावेळी नमूद केले .अध्यक्ष स्थानी असणाऱ्या लक्ष्मण नामदेव थोपटे यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली व असे कार्यक्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक गावात असून समाज विकासासाठी असे विविध कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले .           याच दिवशी परिसरामध्ये एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला . त्यामध्ये सत्यम अर्जुन जगदाळे ,युवराज बाळासाहेब गडदरे ,सुधा सत्यवान भोसले ,रेवती बाळासाहेब भोसले या मान्यवरांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला .तसेच शैक्षणिक क्षेत्रातील  कैलास नेवसे, शिवाजी  काकडे, धनंजय गायकवाड, या शिक्षकांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष धनंजय गायकवाड ,उपाध्यक्ष दादासाहेब थोपटे  यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पिंपरे खुर्द, थोपटेवाडी निरा परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला .
To Top