सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ ची ह्या चालू गळीत हंगामातील पहिली उचल ३ हजार ३०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचेकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्त करण्यात आले.
यावेळी बारामती उद्योगिक सेलचे राजेंद्र जगताप, प्रदीप शेंडकर, प्रवीण भोसले, प्रदीप कणसे, सागर मदने, संग्राम होळकर, राजेंद्र गायकवाड, विनोद गायकवाड, संभाजी होळकर, शिवाजी जगताप, केतन जगताप, बापूराव भोसले, रवींद्र जगताप, निलेश गायकवाड, सोमनाथ सावंत, ओंकार साळुंके उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कारखाना सुरू होवून जवळपास ३६ दिवस पुर्ण झाले आहेत. अद्यापपर्यंत आपण सभासदांना पहिली उचल जाहीर केली नाही. आपण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आज रोजी ३.१० लाख मेट्रिक टन क्रशींग पूर्ण केले असून ३.२५ लाख साखर पोती निर्मिती केली आहे. तरी देखील आपल्या कारखान्याने अद्यापपर्यंत पहिली उचल जाहीर केली नाही, यामुळे सभासदांचे नुकसान होत आहे. सोसायटीचे व्याज सभासदांना नाहक भरावे लागत आहे. बऱ्याच कारखान्यांनी आपली पहिली उचल जाहीर करून पहिले बील देण्यास सुरूवात केली आहे. तरी कारखाना व्यवस्थापणाने पहिली उचल ३,३००/- रूपये जाहीर करून सभासदांचे खात्यावर त्वरीत जमा करावे.
तसेच दि.१२ डिसेंबर रोजी लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस झाला. नेहमी आपण वर्तमान पत्रामध्ये त्यांची जाहिरात देतो. या वेळी आपण आकसाने जाहिरात देणे टाळले. आदरणीय साहेबांमुळेच आपला कारखाना सुस्थितीत आला हे आपणांस माहित आहेच. यामुळे सभासदांच्या भावना दुखावल्या गेल्या. हे कृत्य आपणाकडून अपेक्षित नव्हते. त्याचा आम्ही निषेध करतो.
तसेच सभासदांचा ऊस संपल्याशिवाय आपण गेटकेनचा ऊस आणु नये. सध्या आपण आणत असलेला गेटकेनचा ऊस त्वरीत बंद करून सभासदांचे ऊसाचे तोडीस प्राध्यान्य द्यावे. असे निवेदनात म्हंटले आहे.