सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात सध्या रब्बी पिके जोमात आली असल्याने शेतकरी वर्ग पिकांची भिजवणी करीत आहेत.मात्र पंधरा दिवसांपासून शेतीपंप चोरांचा सुळसुळाट झाल्याने गावांमधील शेतकऱ्यांचे १८ शेतीपंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांची पिके भिजवणी रखडली आहे असे भोर येथील शेतकरी दत्तात्रय बांधल यांनी सांगितले.
वडगाव, भोर, भाबवडी,खानापूर ता.भोर येथील शेतकऱ्यांचे १८ शेतीपंप व विद्युत वाहक तारा अशा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेती पंप चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत.या चोरीच्या घटना थांबणे गरजेचे असले चोऱ्या होतच असल्याने शेतकऱ्यांना शेतीपंप चोरी होऊ नये यासाठी नक्की काय करावे असा प्रश्न भेडसावत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांचे शेतीपंप हे शेतातील बंदिस्त शेतीपंप घरातून चोरून नेले आहेत.अनेक जणांचे शेतीपंप चोरीला गेल्याने शेतातील गहू हरभरा ज्वारी तसेच इतर पिके यांची भिजवणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर अनेकांची पिके पाने विना वाळून चालली असल्याचे चित्र आहे.काही शेतकऱ्यांनी भोर पोलिस ठाण्यात शेतीपंप चोरीला केल्याची घटना नमूद केली आहे.भोर पोलीस प्रशासनाने शेतीपंप चोरट्यांना लवकरात लवकर शोधून अटक करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.पोलीस प्रशासनाकडून शेती पंप चोरट्यांचा शोध सुरू असून लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल असे पोलीस हवालदार शेखर खांडे यांनी सांगितले.