Bhor News l वेनवडीत श्री काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहन : आ. शंकर मांडेकरांसह माजी आ. संग्राम थोपटेंची उपस्थिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
तालुक्यात उद्योग व्यवसायात अग्रगण्य असलेल्या वेनवडी ता.भोर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता मंदिराचा जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण शुक्रवार दि.१३ रोजी उत्साहात पार पडला.
      कार्यक्रमप्रसंगी आमदार शंकर मांडेकर तसेच माजी आमदार संग्राम थोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भोर शहरातून गावच्या वेशीपासून वाजत गाजत भैरवनाथ तसेच जोगेश्वरी देवीच्या मंदिराचे कलश व मुखवटे अबालवृद्धांनी तसेच माहेरवासिनींनी पूजन करून पारंपारिक वाद्य ढोल ताशांच्या निनादात भव्य मिरवणूक काढली.यावेळी भैरवनाथाच्या नावानं चांगभलं ,जोगेश्वरी माता की जय या जयघोषाने तसेच भक्तिमय वातावरणाने वेनवडी परिसर दुमदुमून गेला होता.मंदिरांच्या कलशरोहन ,जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर वेनवडी ग्रामस्थांनी वेश शुद्धीकरण व जागृतीकरण, काळभैरवनाथ महात्म्य ठिकाणावरून प्राणज्योत आणणे, मंदिराची वास्तुशांती होम-हवन, ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री यांच्याकडून श्री भैरवनाथ कथा सांगणे, मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना , मंदिरांचे कलशारोपण असे चार दिवस धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात गावात पार पाडले.मंदिराला १ कोटी ३० लाख रुपये खर्च झाला असून पूर्ण दगडात मंदिर बांधले गेले आहे.मंदिरासाठी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या फंडातून १५ लाख व इतर खर्च लोकवर्गणीतून केला गेला आहे.कार्यक्रमात बोलताना आमदार शंकर मांडेकर यांनी गावच्या उर्वरित विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल असे सांगितले.यावेळी जि. प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जि.प.माजी सदस्य कुलदीप कोंडे, उद्योजक नितीन थोपटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले आदींसह ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
कार्यक्रमात सुवासिनीचा आनंद गगनाला 
ग्रामदैवत काळभैरवनाथ तसेच जोगेश्वरी माता मंदिर कलशरोहन व जीर्णोद्धार कार्यक्रमातील मिरवणूकीत ग्रामस्थ महिला तसेच माहेरवासिनी डोक्यावर कलश घेऊन,एकच रंगाच्या साड्या परिधान करीत गुलाबी फेटे बांधून सामील झाल्या होत्या. हजारो महिलांनी एकत्र येऊन ग्रामदैवतांच्या कार्यक्रमात जल्लोष केला असल्याने सुवासिनींचा आनंद गगनाला भिडला होता.
To Top