सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करत महायुतीचा एकहाती विजय झाला आहे. कोणत्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद राहणार याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. येत्या ५ डिसेंबर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक शाखेकडे मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
यामध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपसरमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे.
संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या ५ टक्के केंद्रांच्या यंत्रांची पुन्हा पडताळणी केली जाते. उमेदवार सांगतील ती ही यंत्रे असतात. या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी ४१ हजार ५०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी आकारून एकूण ४७ हजार २०० रुपये शुल्क आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी ६४ लाख ६६ हजार ४०० रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.