सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना नेहमी चर्चेत राहतो. गत वर्षीच्या ऊसाला कारखान्याने राज्यात उच्चंकी दर दिला. तसेच कारखान्याला नुकताच देशपातळीवरील बेस्ट को-जनरेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे शेतकरी सभासद देखील मागे नाहीत पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील शेतकऱ्यांनी एक एकरात तब्बल १०२ टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात काही प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. यंदाही सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादनाची स्पर्धा सुरू आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी (ता.पुरंदर) गावचे प्रयोगशील शेतकरी दिपक अनिल सावंत व जयंत अनिल सावंत यांनी चालू हंगामामध्ये एकरी १०२ टनाचे उत्पन्न घेतले असल्याची माहिती, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी दिली.काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधूं यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
अनेक प्रयोगशील शेतकरी यंदाही एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना अढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे.त्यांनी को- ८६०३२ जातीच्या उसाचे उत्पन्न एकरी १०२ टन घेतले. त्यांच्या गट क्रमांक ५९ मधील २२ नोव्हेंबर ते २६ या कालावधीत शिवारातील उसाची तोड गाळपासाठी करण्यात आली. त्यामध्ये सावंत यांनी ऊस उत्पादन वाढीचा केलेला विक्रम ऊस विकास विभागाने सर्वांच्या समोर आणला आहे. तो इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते यांनी सांगितले.
दिपक सावंत व जयंत सावंत यांनी को-८६०३२ या जातीच्या ऊसाचे उत्तम नियोजन जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर करून एकरी १०२ टन विक्रमी उत्पादन काढले. आधुनिक पद्धतीने शेती केल्यानंतर शेतीचे उत्पन्न वाढते व शेती फायद्यामध्ये राहते हे या वरून सिद्ध झाले आहे.
सावंत यांनी विक्रमी उत्पादन काढल्याबद्दल श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगतात, माजी संचालक मोहन जगताप, मानसिंग जगतात,पोलीस पाटील श्रीतेज जगताप, प्रविण जगताप, तेजपाल सणस, विश्वास जगताप,ओंकार जगताप,लोकेश जगताप, अरविंद जगताप,तुषार जगताप आदींनी सावंत बंधूचे अभिनंदन केले.