भले शाब्बास l वावर हाय, तर पावर हाय : सोमेश्वर कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी तब्बल ११० टन ऊसाचे उत्पादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी गावचे प्रयोगशील शेतकरी अशोक सधु शिंदे व त्यांचा मुलगा सचिन अशोक शिंदे या बाप- लेकांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच सेंद्रिय खताचा वापर करून ऊसाच्या ८६०३२ या वाणाचे एकरी ११० टन उत्पादन घेऊन पुरंदर तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे. सचिन शिंदे यांनी चालू हंगामामध्ये,२२ पांड क्षेत्रात (४४) गुंठे जमीनीत  १२० टनांपर्यंत ऊसाचे उत्पादन घेतले आहे.एकरी सरासरी ११० टन ऊसाचे उत्पादन मिळवण्यात यश आले असून,अशोक सधु शिंदे यांनी ७ पांड क्षेत्रात (१४) गुंठे जमीनीत ४१ टन ऊसाचे उत्पादन घेतले असल्याची माहिती,कृषी अधिकारी अनिल दुरगूडे, कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते यांनी दिली.
         शिंदे यांनी शेणखत टाकून,शेतीची उभी-आडवी नांगरी केली.यानंतर साडेचार फुट सरी काढली.यामध्ये को-८६०३२ ऊसाच्या रोपाची लागवड पाव्हणे दोन फुट अंतरावर केली होती. ऊस रोप लागण नंतर चार दिवसांनी पहिले ड्रिचींग (आळवणी) केले. यानंतर १५ दिवसांनी दुसरे ड्रिचींग (आळवणी) दरम्यान, ह्वुनिक ॲसिड,१२/६१ खते वापरली.यानंतर २५ दिवसानंतर,पहिला खताचा डोस दिला.एक महिन्यानंतर पंधरा दिवसांच्या फरकाने,तीन वेळेस औषध फवारणी केली.तीन महिन्यांनंतर कोंबड खत टाकून बाळबांधणी केली.पंधरा दिवसानंतर,रासायनिक खते ४०टक्के,सेंद्रिय खते ६० टक्के वापरून मोठी बांधणी केली.बांधणी नंतर दोन महिन्यांनंतर एक खतांचा ढोस देऊन पाचट काढून घेतले होते. नंतर,एक महिन्यानंतर ठिंबक सिंचनच्या माध्यमातून खते दिली होती.
       यासंदर्भात शिंदे यांना मार्गदर्शन,मांडकी येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र चालक माधव जगताप,शिंदे यांचे बंधू ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत अशोक शिंदे यांनी केले असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी दिली.
To Top