सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
छोट्या खेड्यातला शेतमजुराचा मुलगा ते नामवंत उद्योजक अशी आर. एन. शिंदे यांनी घेतलेली गरूडझेप 'आता उरलो उपकारापुरता' या आत्मचरित्राव्दारे समाजापुढे येणं ही नव्या पिढीला प्रेरणादायक बाब ठरणार आहे. माझी आर्थिक परिस्थिती नाही, माझं शिक्षण जास्त नाही, मी खेड्यात जन्माला आलो, मला समाजाचा आधार नाही असे तरूणाईचे सगळे भ्रम या पुस्तकामुळे मोडून पडतील आणि त्यांना स्वयंपूर्ण उद्योजक बनण्याची दिशा या पुस्तकाने मिळू शकेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुण विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले. 
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य संस्थाच्या सहयोगाने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात 'पुणे पुस्तक महोत्सव' पार पडत आहे. या महोत्सवात सोमेश्वरनगर येथील तिरूपती बालाजी मशरूम उद्योगाचे अध्यक्ष आर. एन. शिंदे यांच्या 'आता उरलो उपकारापुरता' या आत्मचरित्राचे प्रकाशन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी काकडे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, 'तिरूपती'च्या संचालिका आशालता शिंदे, मुख्य व्यवस्थापक संजय शिंदे, धन्यकुमार भोसले, आशिष कोठडिया, प्रकाशक मनोज अंबिके, योगेश सोळसकर, महेश जगताप, बाबुलाल पडवळ, राजू बडदे, डॉ. निलेश आढाव, डॉ. नारायण राजुरवार आदी उपस्थित होते.
डॉ. काळकर म्हणाले, शिंदे यांचे आत्मचरित्र गावागावात उद्योजक उभे करू शकण्याच्या क्षमतेचे आहे. आईवडिलांच्या संस्कारातून ते घडले. शिक्षण घेताना प्रचंड मोठा मित्रपरिवार जोडला. पत्नीची सक्षम साथ लाभली. या सकारात्मक गोष्टींच्या जोरावर आणि प्रामाणिक प्रयत्नांतून व्यवसाय यशस्वी होतो हे त्यांनी सिध्द केले आहे. विद्यापीठाच्या पातळीवर अशा पुस्तकांना संदर्भ पुस्तकांच्या यादीत स्थान कसे मिळेल हे पहावे लागणार आहे.
राजेश पांडे म्हणाले, शिंदे यांच्या आत्मचरित्रातून त्यांचा जीवनप्रवास उलगडतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अनेक अपयशांचा सामना केल्यानंतरही त्यांनी कधी हार मानली नाही. त्यामुळे पुढे ते नामवंत उद्योजक म्हणून पुढे आले. केवळ पैसा उभारला नाही तर तो समाजातील गरीब घटकांसाठी उपयोगातही आणत आहेत. एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीचा हा असामान्य प्रवास पुढच्या पिढीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचवायचा हे आपल्याला पहावे लागेल. मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. संतोष शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जया कदम यांनी सूत्रसंचालन केले.