Purandar Breaking l लपतळवाडी येथे शार्टसर्किटने आग : आगीत चार घरे जळून खाक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाल्हे : प्रतिनिधी
लपतळवाडी (ता.पुरंदर) येथील बाळासो भगवान कदम, शिवाजी सर्जेराव कदम, मच्छिंद्र भगवान कदम व सुभाष बाळासासाहेब कदम या चार जणांच्या घरांना आग लागुन नुकसान झाले. शार्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत घराच्या छतासह, रोख रक्कम, दागदागिऩे, कपडे, संसारपयोगी साहित्य, फर्निचर, धान्य आदि जळुन खाक झाले. घरात कोणीही नसल्याने जीव वाचला हेच आमच्यासाठी खुप महत्वाचे आहे अशी प्रतिक्रिया देताना घरातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रु उभे राहिले.यामध्ये जवळपास बारा ते पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
लपतळवाडी येथील बाळासो भगवान कदम, शिवाजी सर्जेराव कदम, मच्छिंद्र भगवान कदम व सुभाष बाळासासाहेब कदम हे कदम कुंटुबिय नेहमीप्रमाणे सोमवार (दि.१६) आपापल्या शेतामध्ये कामासाठी गेले होते. दरम्यान दुपारी घराच्या एका खोलीतुन अचानक धुर निघू लागला. घराला सागवान लाकडाचे माळवद असल्यामुळे बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. घराला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील गावकरी देखील जमा झाले. सुरूवातीला मिळेल त्याने साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास कुटूंबियांसह ग्रामस्थांनी सुरवात केली मात्र आग अधिकच भडकत गेली. यावेळी तातडीने सासवड व जेजुरी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दल दाखल झाले. दुपारी उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले मात्र घरातील गॅस सिलेंडरच्या स्पोटाने घरातील सागवानी लाकडी साहित्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. दरम्यान उशीरा आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत चारही संपुर्ण घरे व घरातील सर्व संसारपयोगी साहित्यासह रोख रक्कम व दागिणे, फर्निचर आदि एवज जळून खाक झाले. घरातील सोन्या चांदीच्या दागिण्यांचे अक्षरक्ष: पाणी झाले. तर नविन ट्रॅक्टर घेण्यासाठी घरामध्ये ठेवलेले पाच ते सहा लाख रूपयांची रोख रक्कम देखील जळून खाक झाली. या आगीमध्ये जवळपास 12 ते 15 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कदम कुटूंबियांनी व्यक्त केला आहे.
शेतातील कामामुळे दोन्ही घरातील सदस्य शेतामध्ये असल्याने सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. चारही घरातील संसारपयोगी साहित्यासह रोख रक्कम देखील जळून खाक होऊन लाखो रूपयांचे शॉर्टसर्किटमुळे आग लागुन नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे तलाठी सचिन कारगळ यांनी व्यक्त केला. कदम कुटंबियांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करुन या नुकसानग्रस्त कुटूंबाला मदत करावी अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
सदर ठिकाणी मंडलअधिकारी रूपाली सरताते, तलाठी सचिन कारगळ, ग्रामसेविका शारदा जगताप आदिंनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

To Top