SOMESHWAR KARKHANA l 'मॉडर्न' कॉलेजच्या प्राध्यापकाने शेतीही केली 'मॉडर्न' : सेवा निवृत्तीनंतर ऊस पिकातून घेतले एकरी तब्बल १०६ टन ऊसाचे उत्पादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
शेती क्षेत्रात कायम नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात मांडकी (ता. पुरंदर) गाव अग्रेसर आहे. श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी गावचे प्रयोगशील शेतकरी तसेच पुणे येथील मॉर्डन कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक मानसिंग साळुंके यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊन निवृत्तीनंतर आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच सेंद्रिय खताचा वापर करून उसाचे एकरी १०६ टन उत्पादन घेऊन पुरंदर तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे. 
         प्रा. साळुंके यांनी त्यांच्या गट क्रमांक ६ मधील दोन एकर क्षेत्रात जवळपास ६२ दिवस खतासाठी शेळ्यामेंढ्या बसवल्या होत्या. यानंतर उभी - आडवी नांगरणी केली. त्यामध्ये नऊ ट्रॉली मळी, पाच
ट्रॉली शेणखत टाकून साडेचार फूट सरी काढली. यामध्ये उसाच्या रोपाची लागवड दोन फूट अंतरावर केली होती. यानंतर खते वापरली. तीन वेळेस ड्रिचिंग, तीन वेळेस फवारणी केली, तसेच दोन वेळेस गोमूत्र गाळून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून उसाला सोडले होते. किमान १५ दिवसांनी पाण्याबरोबर ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून खते सोडली. पाटपाण्याचा वापर अतिशय कमी प्रमाणात केला होता. दरम्यान, उसाचे दोन वेळेस पाचट काढून ते पाचट सरीमध्येच टाकल्याने जमिनीची ओल टिकून राहिली होती. जमीन वाळूमिश्रित असल्याने तसेच निचरा होणारी जमीन असल्याने आणि योग्य वेळी पाणी दिल्याने उसाची वाढ योग्य प्रमाणात होऊन एकरी १०६ टन उत्पादन मिळवण्यात यशस्वी झाल्याचे प्रा. मानसिंग साळुंके यांनी सांगितले. दरम्यान, एकरी १०६ टन ऊस उत्पादन काढल्याबद्दल मांडकी पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने प्रा. साळुंके यांचा सत्कार
करण्यात आला.
To Top