Baramati News l सोमेश्वर कारखाना करणार आता दुप्पट वीजनिर्मिती : शेतकऱ्यांना अंतिम ऊसरात होणार फायदा

Admin
Baramati News l सोमेश्वर करणार आता दुप्पट वीजनिर्मिती : शेतकऱ्यांना होणार फायदा
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाची १८ मेगावॅटहून प्रतिदिन ३६ मेगावॅट विस्तारवाढ करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे पर्यावरण प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैयक्तील लक्ष घातल्याने नुकतेच प्राप्त झाले असून त्यामुळे गुरूवारपासून वीजकंपनीने वीज खरेदी करण्यास प्रत्यक्ष सुरवात केली. यामुळे 'सोमेश्वर' दररोज १२ मेगावॅटऐवजी तब्बल २४ मेगावॅट वीज महावितरणला निर्यात करणार असून शेतकऱ्यांच्या ऊसदरात फायदा होणार आहे. 
            सोमेश्वरने १०० टनी व ८७ केजी प्रेशरचा बॉयलर आणि कन्डेसिंग रूटचे टर्बाईन उभारून १८ मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती २०१० मध्ये उभारला होता. गतहंगामात कारखान्याची दैनंदिन गाळपक्षमता ५००० टन प्रतिदन हून ७५०० प्रतिदिन करण्यात आली. यासाठी आणखी एक शंभर टनी बॉयलरची उभारणी करण्यात आली. त्यालाच नव्याने बॅक प्रेशर रूटचे टर्बाईन जोडून आणखी १८ मेगावॅट वीजनिर्मितीची सुरवात करण्यात आली. ११५ कोटींचे हे सहवीजनिर्मितीचे विस्तारीकरण हंगाम सुरू होताना पूर्ण झाले होते परंतु शासनाच्या समितीकडून पर्यावरण प्रमाणपत्र रखडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर सुनावणी झाली आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेनंतर विविध समित्यांकडून मंजुरी मिळून १८ डिसेंबरला पर्यावरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानुसार कारखान्याने वीजकंपनीला प्रस्ताव पाठविला होता. वीजकंपनीकडून हिरवा कंदील मिळाला आणि गुरूवारी १६ जानेवारीला शंभर टनी बॉयलर आणि १८ मेगावॅटचे टर्बाईन सुरू करून वीजकंपनीचे अधिक्षक अभियंता दीपक लहामगे व सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या हस्ते वीजनिर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, ऋषी गायकवाड, किसन तांबे, कालिदास निकम, एस. एस. गावडे उपस्थित होते.
To Top