सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राजगुरुनगर येथे परप्रांतीय व्यक्तीकडून चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्यांची निघृणपणे हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बारामती तालुका सकल गोसावी समाज संघटनेच्या वतीने बारामती तहसीलदार कार्यालयावर शुक्रवार ( दि. ३ ) मोर्चा काढण्यात आला. याबाबत बारामती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. कसबा पेठे ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आरोपीला शिक्षा देण्याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे दुहेरी हत्याकांड करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. तसेच पीडितेच्या कुटुंबाला शासकीय मदत करावी असा पवित्रा घेत बारामती तहसीलदार कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढून मागणी करण्यात आली. यावेळी बारामती तालुक्यातील निंबुत, निंबुत छप्री, वाणेवाडी, दत्तवाडी गोसावी समाजातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी राजगुरुनगर घटनेचा जलदगती न्यायालयात हा खटला चालवून नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
दगडू बामणे, शिवाजी शिंदे, माणिक पवार, संतोष शिंदे, संजय चव्हाण, निता बामणे, कोमल घाडगे, नकुसा बामणे, पुनम पवार, रिपब्लिकनचे संजय वाघमारे मयूर मोरे आदींनी मनोगतात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. याप्रसंगी रमेश घाडगे, उषा पवार, रमेश चव्हाण, कमलाबाई पवार, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.
-----------
प्रत्येक पीडितेला न्याय द्या..
गोसावी समाजाचा निषेध मोर्चात जनसमुदायाने हाडामासांचे लचके तोडणाऱ्या नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही बघू काय करायचे ते. आम्ही केवळ आमच्या समाजासाठी न्याय मागत नसून महाराष्ट्रातल्या होणाऱ्या प्रत्येक पीडितेला न्याय द्या असे भावनिक साद देताच उपस्थित बघ्यांच्या देखील डोळ्यात अश्रू तरळले.