सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : प्रतिनिधी
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भिगवण नजीक मदनवाडी (ता. इंदापूर) येथे घडली.
कृष्णा संजय तुरकुंडे (वय २१, रा. तळवडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा संजय तुरकुंडे व प्रशांत मच्छिंद्र तुरकुंडे (दोघे रा. तळवडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे सोमनाथ लक्ष्मण शेलार यांच्या ट्रॅक्टरवर काम करत होते. या ट्रॅक्टरमधून बारळगाव (ता. कर्जत) ते शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील बारामती अॅग्रो साखर कारखाना अशी ऊस वाहतूक करण्यात येत होती. मदनवाडी (ता. इंदापूर) येथील घाटातील उतारावर ट्रॅक्टर पाठीमागे येवू नये यासाठी प्रशांत उटी लावण्यासाठी खाली उतरला होता. मात्र, त्याचवेळी तोल जाऊन कृष्णा खाली पडला. ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.