बारामती l वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता निलंबित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
 जिल्हा परिषदेने जनसुविधंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली.
      बारामती पंचायत समितीमध्ये अक्षय झारगड हे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वाघळवाडी येथे जनसुविधंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते. ते काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक तसेच संपूर्ण कार्यवाही ही कनिष्ठ अभियंता म्हणून झारखडे यांच्याकडे होती. प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता परस्पर हा बदल करून काम केले गेले.
       झारगड यांच्याबद्दल अनेक गंभीर तक्रारी आहेत. याप्रकरणी गावकऱ्यांची तक्रार, त्याचबरोबर बारामती पंचायत समितीचे उपअभियंता यांचा अहवाल आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडून झालेली चौकशी, या सर्व बाबी विचारात घेऊन झारगड यांचे निलंबन करण्यात आले.
        जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी कारवाई आहे. बांधकाम विभागामध्ये अनेक कनिष्ठ अभियंत्यांच्या चौकशी सुरू आहेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्या प्रलंबित ठेवून एक प्रकारे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
To Top