सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील जाधववाडी फाट्यावर (ता. पुरंदर) भरधाव आलेल्या एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या लुना चालकाला जोरदार धडक दिल्याने ते उपचारापूर्वीच मृत्यू पावले. लुना चालक विजय काळुराम कोंढाळकर (वय ६७) रा. जाधववाडी रोड जाधवगड कमानीचे वरच्या बाजूला (ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला आहे.
सासवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीराज अशोक ढुमे (वय ४२) रा. ढुमेवाडी, दिवे (ता.पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. ढुमे यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलते विजय काळुराम कोंढाळकर हे ढुमेवाडी हुन जाधववाडी येथील राहत्या घरी लुना मोटारसायकल क्र. एम.एच. १२- यु. एल. ९४३६ चालवत चालले होते. जाधववाडी फाट्यावर रस्ता ओलांडताना बारामती डेपोची भरधाव वेगात येणार एसटी बस क्र. एम.एच. १४- के.यु. ५०४१ ने कोंढाळकर यांच्या लुनाला जोरदार धडक दिली.
ते गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांनी त्यांना सासवडच्या संत सोपानदेव हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सासवड पोलीसांनी बारामती एसटी बसचे चालक ज्ञानेश्वर तुळशीराम भांदुर्गे (वय ३१) रा बारामती डेपो, मुळ निवासी योवता, ता. रिसोड, जिल्हा वाशिम यांना रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आपल्या ताब्यातील बस चालवून कोंढाळकर यांना जोरदार धडक मारुन डोक्यास गंभीर व किरकोळ जखमी करुन मृत्यूस कारणीभूत होऊन तसेच मोटारसायकल (लुना) नुकसानीस कारणीभूत झाल्याबद्दल भांदुर्गे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सासवड पोलीसांनी दिली आहे.